मुंबई : भारतामध्ये येत्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवर निर्बंध आणणारे विधेयक आणण्यात येणार असल्याच्या वृ्त्तानंतर बुधवारी क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीमध्ये 15 टक्क्यांची घसरण झाली होती. आज क्रिप्टोकरन्सीच्या किंमती पुन्हा एकदा सावरल्याचं दिसून येतंय. बिककॉईनसह इतर महत्वाच्या क्रिप्टोकरन्सीच्या किंमती 10 टक्क्यांनी वधारल्या आहेत. 


जगातली सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉईनची किंमत ही 9 टक्क्यांनी वाढली असून ती आता 45 लाख 44 हजार 500 रुपये इतकी झाली आहे. इथेरिअम, डॉजेकॉईन आणि शिबा कॉईन यांच्या किंमतीमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतातील क्रिप्टोकरन्सीचे मार्केट असलेल्या वजिरएक्स (WazirX) ने ही माहिती दिली आहे. 


इथेरिअम, जगातल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सीची किंमत ही 9.91 टक्क्यांनी वधारली आहे. ती सध्या तीन लाख 46 हजार 350 रुपयांवर पोहोचली आहे. 


संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 29 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामध्ये एकूण 26 विधेयकं सादर करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सी अॅन्ड रेग्युलेशन ऑफ ऑफिशिअल डिजिटल करन्सी बिल 2021 हे विधेयक सादर करण्यात येणार आहे. या माध्यमातून खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


झेबपेने दिलेल्या माहितीनुसार, बिटकॉईन, इथेरिअम आणि इतर क्रिप्टोकरन्सींच्या व्यवहारांना यामुळे जास्त काही धोका नाही. या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार हे ट्रेस जरी करता येत असले तरी ते व्यवहार कोण करतं याची माहिती समोर येत नाही. 


येत्या काळात भारतातील 10 कोटी लोकसंख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करेल आणि ही गुंतवणूक तब्बल सहा लाख कोटी रुपयांची असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवणं शक्य होणार नाही असंही म्हटलं जातं. 


संबंधित बातम्या : 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha