Mig-21 Grounded :  भारतीय हवाई दलातील मिग-21(MIG-21) विमानाच्या सातत्याने अपघातग्रस्त होण्याच्या घटना समोर आल्यानंतर जेट विमानांची उड्डाणे  थांबवण्यात आली आहेत. या विमान अपघातांची चौकशी पूर्ण होईपर्यंत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील मिग-21 फायटर विमानांच्या उड्डाणांवर अनिश्चित काळासाठी बंदी  घालण्यात आली आहे. कारण अलीकडेच  8 मे रोजी राजस्थानच्या हनुमान गड येथे मिग-21 फायटर विमान सरावादरम्यान बिघाड होऊन मानवी वस्तीमध्ये अपघातग्रस्त झाले. या अपघामध्ये तीन महिलांना आपला जीव गमवावा लागला होता. या विमानातील दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान राखत स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. पण त्यांनाही किरकोळ जखमी झाल्याचं समजतं.  


या घटनेनंतर भारतीय हवाई दलातील मिग -21 विमानाच्या पू्र्ण ताफ्याच्या उड्डाणावर बंदी आणण्यात आली आहे. हवाई दलाने सांगितले की,  हनुमान गडमध्ये झालेल्या अपघाताची संपूर्ण चौकशी होईपर्यंत  मिग-21 विमानांच्या उड्डाणावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. 


MIG-21 विमान  2025 पर्यंत होणार सेवानिवृत्त 


सध्या भारतीय हवाई दलामध्ये मिग-21 विमानाच्या तीन तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये 16 ते 18 फायटर विमाने आहेत. या तिन्ही तुकड्यांचे मिळून जवळपास 50 फायटर विमाने सेवेत आहेत. ही पन्नास  विमाने 2025 पर्यंत निवृत्त होणार आहेत. मिग -21 विमान सिंगल इंजिनवर चालणारे फायटर विमान असून गेल्या 16 महिन्यात 7 वेळा अपघातग्रस्त झाले आहे. यामध्ये हवाई दलाच्या पाच  वैमानिकांचा जीव गेला आहे. 


उडती शवपेटी म्हटले जाते MIG-21  विमानाला


मिग-21 हे फायटर विमान रशियन बनावटीचे असून सर्वप्रथम 1963 मध्ये भारतीय हवाई दलात सामिल करण्यात आले. तेव्हापासून ते आतापर्यंत भारतीय हवाई दलाला एकूण 872 फायटर विमाने मिळाली आहेत. यामध्ये 500 विमाने अपघातग्रस्त झाली आहेत. या अपघातामध्ये 200 पेक्षा जास्त  वैमानिक आणि 56 लोकांना आपला जीव गमावावा लागला. याचं कारणामुळे या विमानाला उडती शवेपटी आणि सर्वाधिक धोकादायक असं म्हटले जाते. 


अजूनही हवाई दलाच्या सेवत का आहे मिग-21  


1990 च्या दशकात मिग- 21 फायटर विमान निवृत्त झाले होते. यानंतरही या विमानाला अनेकवेळा अपग्रेड करण्यात आले आहे. याबाबत ऑक्टोंबर 2014  मध्ये हवाई दलाच्या प्रमुखाने सांगितले होते की,  जुन्या विमानांना हवाई दलाच्या सेवेतून हटवण्यात उशिर केल्यामुळेभारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. कारण या विमानांचा काही भाग खूप जुना झाला आहे. खरे तर भारतीय हवाई दलात नवीन फायटर विमाने सामिल करण्यात उशिर होत आहे. यामुळे मिग-21 विमानाच्या सेवानिवृत्तीनंतरही भारतीय हवाई दलात सेवेसाठी उपलब्ध आहे.