IMA Corona Health Advisory : भारतात केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्यास आणि मास्क वापरण्याचं (Use Mask) आवाहन करण्यात आलं आहे. याआधी सरकारने बुधवारी झालेल्या बैठकीनंतर लोकांना आवश्यक कोरोना मार्गदर्शक तत्वे पाळण्याचे आवाहन केले. राज्यांना कोरोना संदर्भातील पुढील रणनीती आखण्याची सूचनाही केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार खबरदारीचे उपाययोजना करताना दिसत आहे.
IMA कडून मार्गदर्शक सूचना जारी
केंद्र सरकारकडून 22 डिसेंबर रोजी रात्री उशिरा नवीन मार्गदर्शक सूचना ( Corona Health Advisory) जारी करण्यात आली आहे. यानुसार, लोकांना सार्वजनिक स्थळी लग्न, समारंभ, राजकीय किंवा सामाजिक सभा तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास यासारखे सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
देशात 163 नवे कोरोनाबाधित
भारतात गेल्या 24 तासांत 163 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या चार हजारांहून कमी आहे. सध्या देशात 3,380 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.
भारतात BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण
भारतामध्ये ओमायक्रॉनच्या (Omicron) सबव्हेरियंटचा भारतात शिरकाव झाला आहे. देशात ओमायक्रॉनच्या BF.7 सबव्हेरियंटचे (BF.7 Variant) चार रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya ) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नियोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मांडविया यांनी गुरुवारी राज्यसभेत भारतातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय
जगभरात कोरोना रुग्णांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. चीन, ब्राझील,अमेरिका, इटलीसह दक्षिण कोरियामध्येही कोरोना रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे भारतातील कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. असं असलं तरी भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जीनोम सीक्वेन्सिंगबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.