Masks Mandatory in Karnataka : चीनसह (China) जगभरात वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये (Karnataka) मास्कसक्ती (Mask) लागू करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने बंद ठिकाणी (Closed Places) आणि एसी रूममध्ये (AC Room) मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढाव्यासंदर्भातील गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर सरकारने मास्कसक्तीची घोषणा केली आहे. नव्या निर्बंधांनुसार, बंद ठिकाणी आणि एसी रूममध्ये मास्क वापरणे अनिवार्य आहे. जगभरात कहर माजवणाऱ्या  ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट BF.7 चे भारतात चार रुग्ण सापडल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.


कर्नाटकमध्ये मास्कसक्ती लागू 


कर्नाटक सरकारने खबरदारी म्हणून नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, बंद ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांची कोविड-19 चाचणी केली जाईल. रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर, प्लांट आणि जनरेटर तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.


भारत सरकार अलर्ट मोडमध्ये


चीनमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता भारत सरकार अलर्ट मोडवर आहे. कोविड संदर्भात केंद्र सरकारकडून बैठका घेण्यात येत आहेत. कोविड संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. राज्य सरकारकडूनही आपापल्या राज्यांमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीची पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, फ्लूची लक्षणे आढळल्यास कोविड चाचणी करणे आवश्यक आहे.


'जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवेणार'


देशात कोरोना विषाणूचे नवीन प्रकार BF.7 आढळल्यानंतर प्रशासन हाय अलर्टवर आलं आहे. सर्व राज्यांमध्ये कोरोना संदर्भात बैठका सुरू आहेत. BF.7 म्हणजेच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे जगभरात कोरोना संसर्ग वाढला आहे. कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितलं की, राज्य सरकारकडून कोविड चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. तसेच कोविड-19 च्या नवीन रुग्णांचे सर्व नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील.


आरोग्यमंत्र्यांकडून बुस्टर डोस घेण्याचं आवाहन


आरोग्य मंत्री म्हणाले, 'केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यास सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा BF.7 हा व्हेरियंट काही राज्यांमध्ये सापडला आहे. नवीन व्हेरियंटचा भारतात शिरकाव झाला आहे. या व्हेरियंटचा शिरकाव कर्नाटकातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचं आवाहन केलं आहे.