AIIMS Director on COVID-19 Vaccine : कोरोनावरील प्रभावी लस कधी येणार आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच एबीपी न्यूजने दिल्लीतील एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांच्याशी खास बातचित केली आहे. त्यावेळी बोलताना डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, 'देशातील 100 टक्के लोकांना कोरोनाची लस देण्याची गरज नाही. 50 ते 60 टक्के लोकांना वॅक्सिन दिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. तो वाढणार नाही.'
डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, "लसिकरण करण्याची दोन उद्दिष्ट आहेत. ज्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका आहे, त्या लोकांना कोरोना लस देण्यात येणार आहेच. दुसरं म्हणजे, आम्हाला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचाय. जेणेकरून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल. त्यासाठी जर देशातील 50-60 टक्के लोकांना वॅक्सिन दिलं तर व्हायरसचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. व्हायरसचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संसर्ग होणार नाही. अशाप्रकारे कोरोनाची रुग्णसंख्याही आटोक्यात येईल. 100 टक्के लोकांना लस देण्याची गरज भासणार नाही."
देशभरात लस पोहोचेल : डॉ. रणदीप गुलेरिया
डॉ. गुलेरिया बोलताना म्हणाले की, "वॅक्सिनचं ट्रायल अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या महिन्यात रेग्युलेटरी अप्रुव्हल मिळणं गरजेचं आहे. पुढिल दोन ते तीन महिन्यांत लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. संपूर्ण देशात लस पोहोचवण्यात येईल. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला एक नाही, तर दोन ते तीन लस उपलब्ध होतील. जास्त वॅक्सिन असतील तर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील."
पुढे बोलताना ते म्हणाले की, "जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर पुढील सहा महिन्यांत किंवा वर्षभरात त्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होणार नाही, असं सांगता येत नाही. सुरक्षित पद्धत हिच आहे की, सर्वांना लसीकरण केलं जावं. मग त्या व्यक्तीला कोरोना झालेला असो वा नसो. लसीचा डोस दिल्याने कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही, तर फायदाच होईल. त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती आणखी वाढेल. त्यामुळे सर्वात उत्तम उपाय म्हणजे, आपण सर्वांना कोरोनाची लस द्यावी, हाच आहे."
एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी बोलताना सांगितलं की, "असं मानलं जात आहे की, नवीन लस दिल्यानंतर शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून त्यामुळे कोरोनापासून पूर्णपणे बचाव होऊ शकतो. परंतु, हे शक्य नाही. कारण काही लसी कदाचित पूर्णपणे प्रभावी ठरू शकणार नाहीत. परंतु, याबाबत अद्याप कोणतेही आकडे समोर आलेले नाहीत."