नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील सात दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येने शेतकरी जमले आहेत. शेतकरी मागे हटण्यास तयार नसल्याने आता त्यांचं आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. आज शेतकरी संघटनांचे प्रनिनिधी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याशी बातचित करणार आहेत. याआधी मंगळवारी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक पार पडली होती. परंतु, ही बैठक निष्फळ ठरली होती.


12 वाजता पार पडणार शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बैठक


आज दुपारी 12 वाजता दिल्लीतील विज्ञान भवन येथे शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात बैठक पार पडणार आहे. याआधी मंगळवारी (1 डिसेंबर) रोजीही शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात बैठक पार पडली होती. परंतु, ही बैठक निष्फळ ठरली होती. अशातच आज दुपारी पुन्हा एकदा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात बैठक पार पडणार आहे. या बैठकीत 32 संघटना आणि तीन संयुक्त मोर्चातील शेतकरी नेते सहभागी होणार आहेत. या सर्व व्यक्ती सकाळी 10 वाजता वसने विज्ञान भवनात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. सर्व शेतकरी संघटना तिनही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. तसेच केंद्र सरकार यामध्ये काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे.



देशभरातील शेतकरी आंदोलनातील काही महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरुपात :




  • शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस. दुपारी 12 वाजता सरकारसोबत होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत तरी तोडगा निघणार का? याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. तसेच दिल्लीतल्या शेतकरी आणि सरकारच्या बैठकीत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्या करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

  • शेतकऱ्यांनी विशेष अधिवेशन बोलावून हे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

  • आता शेतकऱ्यांनी सिंधु ( दिल्ली-चंदीगड रोड ), टिकरी ( दिल्ली-रोहतक रोड ) आणि गाझीपूर ( यूपी गेट ) या तीन बॉर्डर बंद केल्या आहेत. पण मागण्या मान्य केल्या नाहीत तर इतर दोन बॉर्डरही सील करण्याचा इशाराशेतकऱ्यांनी दिला आहे.

  • सध्या दिल्ली बदरपूर बॉर्डर खुली आहे, गुरुग्राम बॉर्डरही सुरु आहे. हा रस्ता जयपूरकडे जातो. लोनी बॉर्डर खुली आहे. हा रस्ता बागपतकडे जातो.

  • हरियाणाच्या रोहतक, जिंदमधून खापांनी दिल्लीकडे कूच केलं आहे. जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर हरियाणातून येणाऱ्या भाज्या आणि दूध बंद करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.

  • जम्मू काश्मीरमध्ये दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. जम्मू सिव्हिल सोसायटी, शिख संघटना आणि ओबीसी संघटना रस्त्यावर उतरणार आहेत.

  • दिल्ली Goods Transport Organization आणि All india motor & goods transport association नंही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

  • दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला राजू शेट्टी यांनीही पाठिंबा दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आज रात्रभर आत्मक्लेश आणि जागर आंदोलन करणार आहे.


पाहा व्हिडीओ : दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरुच! शेतकऱ्यांची भूमिका काय?


पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार


पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. शेतकरी संघटना आणि सरकारमधील चर्चेआधी दिल्लीमध्ये ही भेट होणार आहे. शेतकरी आंदोलनावरुन पंजाब सरकारची आक्रमक भूमिका पाहता ही भेट अतिशय महत्त्वाची समजली जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह याआधीही अमित शाहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. परंतु तेव्हा शाह आणि त्यांची भेट होऊ शकली नव्हती.


पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह सातत्याने केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्यांचा विरोध करत आहेत. कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या संघर्ष योग्य असल्याचं सांगत तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज का ऐकत नाहीत? आणि या मुद्द्यावर हट्टाची भूमिका का असे सवालही उपस्थित केले होते.


महत्त्वाच्या बातम्या :