मुंबई :  कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आजपासून देशातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे दरम्यान, कोरोनानं पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं बोलंलं जात आहे. अशा परिस्थितीत राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग असून सर्वांचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी केली होती.


CoWIN पोर्टल अपग्रेड, आजपासून दररोज 1 कोटी नोंदणी होणार


कोविड 19 लस नोंदणीसाठी आता को-विन (CoWIN) पोर्टल देखील अधिक कार्यक्षम करण्यात आले आहे. आता दररोज एक कोटी नोंदणी या पोर्टलवर स्वीकारली जाणार आहे. यासोबतच दररोज 50 लाख लोकांच्या लसीची नोंद होऊ शकते. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण 1 एप्रिलपासून सुरू केले जात आहे. त्यामुळे नोंदणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे या पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.


राज्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच 


कोरोना रुग्णसंख्येत धडकी भरवणाऱ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असतानाच बुधवारी तब्बल 24,00,727 रुग्णांनी या संसर्गावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. परिणामी राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता  85.34% झालं आहे. कोरोना रुग्णसंख्येतील हा चढ- उतार सुरु असतानाच काल  कोरोनामुळं दगावणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवणारा ठरला. काल दिवसभरात 227 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. परिणामी आरोग्य विभाग अधिकच सतर्क झाला आहे.