नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात थैमान घातलं आहे. लसीकरण करणे हे कोरोनाविरोधात सर्वात मोठं शस्त्र मानले जाते. मात्र, सद्य परिस्थिती पाहता देशात लसीकरणाचा वेग समाधानकारक नाही. बर्‍याच राज्यात लसींची तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेच लसीकरणाचा आलेख एकदम खाली आला आहे. परिणामी कोरोनाची साखळी कशी तुटेल असे प्रश्न उपस्थित होत आहे.


शुक्रवारी संपूर्ण देशात केवळ 11 लाख 3 हजार लसींचे डोस देण्यात आले. त्यापैकी 6 लाख 29 हजार लोकांना पहिला डोस देण्यात आला, तर 4 लाख 74 हजार लोकांना दुसरा डोस देण्यात आला. हा वेग खूप कमी आहे. यापूर्वी गुरुवारी 23 लाख, बुधवारी 21 लाख, मंगळवारी 27 लाख डोस देण्यात आले होते. आतापर्यंत देशात एकूण 18 कोटी डोस देण्यात आले आहेत. यापैकी 13.93 दशलक्ष लोकांना पहिला डोस देण्यात आला.


लसींचा तुटवडा हे सर्वात मोठे आव्हान बनले आहे. देशात अशी फक्त सहा राज्ये आहेत जिथे एका कोटींपेक्षा जास्त लसींचे डोस दिले गेले आहेत. यामध्ये गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.


पुढील दोन महिन्यांत लसीचं संकट संपेल?
येत्या दोन महिन्यांत देशातील लसीचे संकट संपेल, असा अंदाज आहे. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, लस उत्पादक कंपन्या भारतात उत्पादन सुरू करणार असल्याने येत्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होतील. याशिवाय बाहेरूनही लसही येणार आहेत. डॉ. गुलेरिया म्हणाले की, जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर नेहमीच लसींची कमतरता राहील.


31 मे पर्यंत राज्यांना 192 लाख कोविड लस केंद्र देणार
केंद्र सरकारने शुक्रवारी पुढच्या पंधरवड्यात 16 ते 31 मे दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सुमारे 192 लाख कोविड लस पुरवण्याची घोषणा केली. या पंधरवड्यात, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या 191.99 लाख डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनाशुल्क पुरवले जातील. गेल्या पंधरवड्यात म्हणजे म्हणजे 1-15 मे 2021 मध्ये केंद्र सरकारकडून राज्यांना 1.7 कोटीहून अधिक डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच, राज्ये तसेच खासगी रुग्णालयांसाठी मे महिन्यात 4.39 कोटी लस थेट खरेदीद्वारे उपलब्ध करुन दिली आहे.