Coronavirus India Peak : मागील काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या ओमायक्रॉनमुळे असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच आता आयआयटी मद्रासमधील संशोधकांनी चिंता वाढवणारा अंदाज वर्तवला आहे. पुढील महिन्यात 1 चे 15 फेब्रुवारी दरम्यान कोरोनाचा जोर वाढणार असून संसर्ग परमोच्च बिंदू गाठणार आहे. या आठवड्यात R-naught मूल्य 4 इतके झाले असल्याची माहिती डॉ. जयंत झा यांनी दिली.
R-naught अथवा R-0 नुसार संसर्गबाधित व्यक्ती किती लोकांमध्ये आजार फैलावू शकते. याबाबत अंदाज दर्शवतो. R-naught चे मूल्य एक पेक्षा कमी असेल तर महासाथ संपुष्टात येईल असे समजले जाते. IIT मद्रासने केलेल्या संगणकीय मॉडेलिंगच्या प्राथमिक विश्लेषणावर आधारित माहितीनुसार R-0 मूल्य मागील आठवड्यात (25 डिसेंबर ते 31 डिसेंबर) राष्ट्रीय स्तरावर 2.9 च्या जवळ होते. या आठवड्यात (1-6 जानेवारी) ही संख्या 4 नोंदवली गेली.
आयआयटी मद्रासचे गणित विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. जयंत झा यांनी 'पीटीआय' सोबत बोलताना सांगितले की, विलगीकरणाच्या उपाययोजना अथवा निर्बंधात वाढ केल्यास संपर्क दर कमी होईल आणि त्यामुळे R-0 च्या मूल्यात घट होऊ शकते असेही डॉ. जयंत झा यांनी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी म्हटले होते की, भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ओमायक्रॉनमुळे ही वाढ होत असल्याचे समजण्यात येत आहे. सध्या देशाचे R-0 मूल्य 2.69 इतके आहे. तर, दुसऱ्या लाटेच्या वेळी R-0 मूल्य 1.69 इतके होते.
डॉ. जयंत झा यांनी सांगितले की, आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केलेला अंदाज हा वेगळ्या वेळेच्या अंतरावर आधारीत आहे. तर, आयआयटी मद्रासने विश्लेषण केलेले आकडे हे मागील दोन आठवड्यातील आहे. सध्याच्या लाटेचा परमोच्च शिखर 1 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान असणार असल्याचा अंदाज झा यांनी व्यक्त केला.
R-0 अथवा R-naught मूल्य म्हणजे काय?
R-naught अथवा R-0 नुसार संसर्गबाधित व्यक्ती किती लोकांमध्ये आजार फैलावू शकते. याबाबत अंदाज दर्शवतो. R-naught चे मूल्य एक पेक्षा कमी असेल तर महासाथ संपुष्टात येईल असे समजले जाते. R0 तीन गोष्टींवर अवलंबून आहे - संक्रमणाची संभाव्यता, संपर्क दर आणि संसर्ग होण्यासाठी, फैलावण्याचा अपेक्षित वेळ या गोष्टींवर R-0 चे मोजमाप केले जाते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Omicron in India: देशातील 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण
- Coronavirus Updates :काही दिवसात मुंबई, दिल्लीत कोरोनाचा जोर! 'सूत्र' मॅाडेलनुसार तिसऱ्या लाटेची परमोच्च पातळी 'या' काळात