Covid Vaccination: देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच आज सरकारने सांगितले की, ज्यांना लसीकरण करण्यासाठी घराबाहेर जाता येत नाही, त्यांना आथा घरीच लस देण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, अपंग आणि जे लोक चालण्या फिरण्यास असमर्थ आहेत अशांना आम्ही घरीच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.
सध्या 18 वर्षांवरील लोक लसीकरण केंद्रात जाऊन लस घेत आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या मते, 18 वर्षांवरील वयोगटात 66 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे आणि 23 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 35.4 टक्के शहरी भागात आणि 63.7 टक्के ग्रामीण भागात लसीकरण करण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाने आवाहन केलंय की आता सणासुदीचे दिवस येत असून लोकांनी काळजी घ्यायला हवी. लसीकरणानंतरही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सप्टेंबर महिन्यात प्रतिदिनी सुमारे 81.76 लाख लस टोचण्यात आल्या आहेत. ऑगस्टमध्ये हा दर 59.19 लाख प्रतिदिन होता. प्रत्येक महिन्यात लसीकरण वाढत आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोविड -19 लसींचे 83.39 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट झाली असूनही आपण अजूनही साथीच्या दुसऱ्या लाटेत आहोत. त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सणांसाठी गाईडलाईन्स
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर उत्सवाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व राज्यांना एसओपी पाठवण्यात आले आहेत. सणांसाठी जिथं 5 टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्ह दर आहे, तिथं गर्दी जमू देऊ नये. कोणत्याही गर्दीसाठी पूर्व परवानगी घेण्यात आलेली असावी. तसेच त्यामध्ये लोकांची संख्याही सांगितली पाहिजे. त्याचवेळी, नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के.पॉल यांनी लोकांना आवाहन केले की, सणांमध्ये आपण निष्काळजी राहू नये घरीच राहून सण साजरे करावे.
आरोग्य सचिवांनी सांगितले की, सर्वात जास्त सक्रिय प्रकरणे केरळमध्ये, नंतर महाराष्ट्र, तामिळनाडू, मिझोराम, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आहेत. केरळ हे एकमेव राज्य आहे जिथे कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी 62.73 टक्के या राज्यातील होते.
ते म्हणाले की, 33 जिल्ह्यांमध्ये, कोरोनाचे 10 टक्क्यांहून अधिक नवीन प्रकरणं साप्ताहिक स्तरावर नोंदवले जात आहेत, तर 23 जिल्ह्यांमध्ये 5 ते 10 टक्के प्रकरणे नोंदवली जात आहेत.