Qutub Minar Complex: कुतुबमिनार कॉम्प्लेक्समध्ये पूजेची मागणी करण्यात आली आहे. यासाठी न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. दिल्लीचे साकेत न्यायालय गुरुवारी 9 जून रोजी या याचिकेवर निकाल देऊ शकते. साकेत न्यायालयाच्या अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून 9 जूनपर्यंत निर्णय राखून ठेवला होता.


हिंदू पक्षकारांच्या मागणीला विरोध


हिंदू आणि जैन देवतांची पुनर्स्थापना आणि कुतुबमिनार संकुलात पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी दिल्लीच्या साकेत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत दावा करण्यात आला आहे की, कुतुबमिनार संकुलात हिंदू देवतांच्या अनेक मूर्ती आहेत. त्यानंतर न्यायालयाने एएसआयला या प्रकरणी न्यायालयात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर एएसआयने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात एएसआयने कुतुबमिनार संकुलातील हिंदू बाजूच्या पूजेच्या मागणीला स्पष्टपणे विरोध करत हे स्मारक असून येथे कोणालाही पूजा करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे सांगितले होते.


हिंदू पक्षकारांनी दिला अयोध्या प्रकरणाचा हवाला


कुतुबमिनारवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी हिंदू पक्षाला विचारले की, तुम्हाला स्मारकाला प्रार्थनास्थळ बनवायचे आहे का? हिंदू पक्षातर्फे वकिल हरी शंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री यांनी या प्रकरणात अयोध्या प्रकरणाचा हवाला दिला. ते म्हणाले की, अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टानेही देवी-देवता सदैव उपस्थित असतात असे मानले होते. वकिलाने सांगितले की, जी जमीन देवांची आहे, ती नेहमीच त्यांची राहते. जोपर्यंत त्यांचे विसर्जन पूर्ण कायद्याने होत नाही. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानेही अयोध्या निकालात हा मुद्दा मान्य केला आहे, असा युक्तिवाद वकिलांनी केला.


कुतुबमिनार परिसराला वादग्रस्त म्हणता येणार नाही


साकेत कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती म्हणाले होते की, जर देवता 800 वर्षे पूजेशिवाय उपस्थित असतील तर त्यांना यापुढेही असेच राहू द्यावे. तुम्हाला तिथे पूजा करण्याचा अधिकार आहे की नाही हा मुद्दा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. मूर्तींच्या वादावर न्यायालयाने सांगितले की, तेथे काही अवशेष असले तरी ते जतन करण्याचा आदेश आहे. त्याचवेळी वकील हरिशंकर जैन म्हणाले होते की, या जागेला वादग्रस्त म्हणता येणार नाही. कारण गेल्या 800 वर्षांपासून येथे नमाज अदा होत नाही.