'नरेंद्र मोदीजी आम्ही तुमच्यामुळे विवाहबंधनात अडकलो. मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फेसबुक पेजवर मोदींच्या समर्थनार्थ कॉमेंट केली आणि त्यांच्या मतदारसंघातील या सुंदर युवतीने ती कमेंट लाईक केली. आम्ही बोललो. भेटलो आणि आम्ही दोघंही तुम्हाला समर्थन देत असल्याचं लक्षात आलं. आम्हाला देशासाठी जगायचं आहे आणि म्हणूनच आम्ही ते एकत्र करण्याचं ठरवलं' असं जयने सोशल मीडियावर लिहिलं होतं.
जयची पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली. काही जणांनी या दाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव केला, तर कोणी त्यांचे मीम्स बनवत त्यांना ट्रोलही केलं. जयने नंतर आपला ट्वीट डिलीट केला होता. दुसरी पोस्ट डिलीट करण्याच्या नादात हा ट्वीट डिलीट झाल्याचा दावाही त्याने केला होता.
लग्नानंतर जेमतेम महिन्याभरातच अल्पिकाने जयवर व्यभिचार आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. जयने भाजप आणि स्वतःच्या सोशल मीडिया प्रचारासाठी आपल्या फोटोचा गैरवापर केल्याचा दावाही अल्पिकाने केला आहे. त्याच्या जाचामुळे आपल्या मनात आत्महत्येचे विचार मनात घोळत असल्याचंही अल्पिका म्हणाली.
'मी फक्त 18 वर्षांची आहे, आणि तो चेहऱ्यावरुन दिसत नसला तरी 29 वर्षांचा आहे. सर्वप्रथम, त्याने माझ्या संमतीविना आमचा फोटो ट्वीट केला. स्वतःच्या प्रचारासाठी याचा वापर केला. भाजप आणि सोशल मीडियामध्ये स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी त्याने हा उपद्व्याप केला' असा संताप अल्पिकाने व्यक्त केला.