Covid Restriction :  दिल्ली आणि तामिळनाडू या राज्यांनी लागू केलेल्या कोरोना निर्बंध शिथीलता आणली आहे. तामिळनाडूमध्ये आता एक फेब्रुवारीपासून पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. तर, दिल्ली सरकारने वीक एन्ड संचारबंदी ही मागे घेण्यात आली आहे. त्याशिवाय रेस्टोरंट्स आणि चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेसह पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. 


तामिळनाडू सरकारने काय घेतला निर्णय?


तामिळनाडू सरकारने एक फेब्रुवारीपासून शाळा पुन्हा सुरू करण्यासह इतरही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यात आजपासून रात्रीची संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. त्याशिवाय रविवारी, 30 जानेवारीचा लॉकडाउन मागे घेण्यात आला आहे. प्रार्थनास्थळे सर्वच दिवशी खुली राहणार आहेत. मात्र, विवाह सोहळ्यासाठी फक्त 100 पाहुणे आणि अंत्यसंस्कारात फक्त 50 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.


रेस्टॉरंट्स, सलून, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, योगा सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे. 


दिल्लीत काय सुरू, काय बंद?


दिल्लीत कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत काही निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची गुरुवारी बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. राजधानीत शनिवार व रविवारची संचारबंदी हटवण्यात आली आहे. मात्र, रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत असणारी रात्रीची संचारबंदी कायम असणार आहे. याशिवाय आता ५० टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करता येणार आहेत. शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


विवाह सोहळ्यात आता 200 पाहुण्यांना आमंत्रित करता येणार आहे. या आधी फक्त 15 लोकांना विवाह सोहळ्यात हजर राहण्यास परवानगी होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha