Omicron in India : देशात कोरोनाची तिसरी लाट आल्याने कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा उच्चांक पाहायला मिळतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, “देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे निरीक्षण सुरु आहे. तिसऱ्या लाटेचे प्रारंभिक संकेत केवळ काही प्रदेशांपुरतेच मर्यादित आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे देशातील कोरोना संसर्गामध्ये वाढ होत आहे. ओमायक्रॉनच्या BA.1 उपप्रकारापेक्षा नवा BA.2 उपप्रकार अधिक वेगाने पसरत आहे. जानेवारी महिन्यात जीनोम सिक्वेंसिंगमध्ये नऊ हजारहून अधिक ओमायक्रॉन रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमध्ये देशातील 10 राज्यांमध्ये सातत्याने रुग्ण वाढ पाहायला मिळतेय. देशातील एकूण रुग्णांच्या 77 टक्के रुग्ण या 10 राज्यांमधील आहेत. देशातील कोरोना रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार सुरु आहेत.


सुरुवातीला ओमायक्रॉनच्या BA.1 उपप्रकाराचा अधिक संसर्ग पाहायला मिळाला. मात्र आता ओमायक्रॉन सामुदायिक संसर्गाच्या टप्प्यात असताना BA.2 उपप्रकाराचा संसर्ग अधिक झपाट्याने होत असल्याचं निरीक्षणात आलं समोर आलं आहे. मात्र, हा संसर्ग काही राज्यांसाठी मर्यादित असल्याचं उघड झालं आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचेही नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हे रुग्ण महाराष्ट्र, ओदिसा, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून आले आहेत.


आरोग्य सचिवांनी पुढे सांगितले की, ''देशात डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत कोरोनाच्या डेल्टा प्रकाराची जागा ओमायक्रॉनने घेतली. जीनोम सिक्वेंसिंगवरील माहितीच्या आधारे हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सक्रीय रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लसीकरण. लसीकरणामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. यामुळे कमी प्रकरणे, कमी रुग्णालयात दाखल आणि कमी मृत्यू झाले'', असे मंत्रालयाने म्हटले आहे.


देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा 7 मे 2021 रोजी उच्चांक पाहायला मिळाला, तेव्हा 4,14,188 नवे रुग्ण आणि 3,679 मृत्यू झाले होते. यावेळी केवळ 3 टक्के लोकांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले. याची तुलना तिसऱ्या लाटेसोबत केली असता, मंत्रालयाने सांगितले की, 21 जानेवारी 2022 रोजी देशात 3,47,254 नवे रुग्ण आणि 435 मृत्यूची नोंद झाली यावेळी 75 टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे.


आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये आता तिसरी लाट शिगेला पोहोचली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha