Mahesh Manjrekar : दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'नाय वरण भात लोणचा कोन नाय कोणचा' या चित्रपटावरून त्यांच्याविरोधात विशेष पोक्सो कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


महेश मांजेरकर यांचा 'नाय वरण भात लोणचा कोन नाय  कोणचा' हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अल्पवयीन मुलगा आणि स्त्रीमध्ये शारिरीक जवळीक दाखवण्यात आल्याने चित्रपटावर टीका सुरू झाली होती. त्यानंतर आता दिग्दर्शक महेश मांजरेकरांविरोधात मुंबई सत्र न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड विधान 156(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सीमा देशपांडे यांनी याआधी महेश मांजरेकरांविरोधात माहीम पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी याची दखल न घेतल्यामुळे त्यांनी विशेष पोक्सो कोर्टात धाव घेतली. आता, देशपांडे यांच्या तक्रारींवर सोमवारी कोर्टात सुनावणी होणार आहे. 


चित्रपटावर नाराजी 


'नाय वरण भात लोणचा कोन नाय  कोणचा' या चित्रपटात  किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाची एक वेगळी कथा प्रेक्षकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कथेची पार्श्वभूमी गिरणी संप, गिरणगावातील चाळींशी संबंधित होती. किशोरवयीन मुलाचे नात्यातील प्रौढ महिलेशी संबंध चित्रपटात दाखवण्यात आले होते. यावर गिरणगावातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. महेश मांजरेकर यांच्या चित्रपटामुळे गिरणगाव आणि चाळीतील मुलांबाबत दिशाभूल होत असल्याचा मुद्दा अनेकांनी मांडला होता.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha