नवी दिल्ली : कोरोनाचे संकट संपले नसले तरी देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. गेल्या चोवीस तासात 12,143 जणांना कोरोनाची लागण झाली असून 103 जणांचा देशात मृत्यू झाला आहे. देशात लसीकरणाची मोहिम सुरू असून आतापर्यंत 79 लाखापेक्षा जास्त जणांनी लस घेतली आहे.


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 1 कोटी 8 लाख 92 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 55 हजार 550 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचे 1 लाख 36 हजार अॅक्टिव्ह केस आहेत. ज्यांच्यावर उपचार सुरू आहे.


18 राज्यात एकही मृत्यू नाही


कोरोनामुळे गेल्या 24 तासात 103 जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहे. अंदमान आणि निकोबार, आंध्रप्रदेश, अरूणाचल प्रदेश, आसम, दादरा नगर हवेली आणि दमन दीव, गोवा, झारखंड, लडाख, लक्षद्वीप, मणीपूर, नागालँड, मिझोरम, पुद्दुचेरी, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश या 18 राज्यात कोरोनाचा एकही मृत्यू झाला नाही.




आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत एकूण 20 कोटी 55 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 7 लाख चाचण्या या गुरुवारी एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सर्व राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात कोरोना व्हायरसचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यापेक्षा जास्त आहे.


कोरोनाचा सध्याचा मृत्यूदर हा 1.43 टक्के इतका आहे तर त्यातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही 97.32 टक्क्यांवर पोहचलं आहे. देशातील कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही 1.25 टक्के इतकी आहे. गुरुवारी एका दिवसात 4.62 लाख लोकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.



कोरोना लसींच्या साठवणूकीसाठी 'गोदरेज अँड बॉइस'कडून 'अल्ट्रा-लो टेम्परेचर फ्रीझर'ची निर्मिती