जालना : लसीकरणानंतरही राज्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत असली तरी लॉकडाऊनचा विचार नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्री जालन्यात बोलत होते. तसंच राज्याचा कोरोनाचा आलेख स्थिर असल्याचंही ते म्हणाले.
लसीकरणानंतरही राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र याबाबत कोरोनाच्या नियमांचं पालन करणं हाच एकमेव पर्याय आहे. मात्र राज्यात पुन्हा कुठेच लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही किंवा त्याचा संबंध देखील नाही अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
त्याचबरोबर कोरोना लसीचा पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमध्ये एक महिन्याचं अंतर पाहिजे आणि त्यानंतर पंधरा दिवस काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
कोरोनाच्या वाढ रुग्णसंख्येवर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्याचा कोरोनाचा आलेख स्थिर आहे. तसंच कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्याचंही त्यांनी म्हटलं.
नागपुरात कोरोनाचा उद्रेक
नागपूर शहरात कोरोना संक्रमणाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. काल (गुरुवारी) नागपूर जिल्ह्यात तब्बल 500 नवे कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी फक्त नागपूर शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 445 एवढा होता. त्यामुळे नागपूर महानगरपालिका खडबडून जागी झाली आहे. आज महापालिका आयुक्त यांनी नागपूरकरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देतानाच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत वाढत असलेल्या बेफिकरीबद्दल चिंता व्यक्त केली.