Coronavirus in India : देशात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे. कोरोनाचे संकट असताना नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासांमध्ये 7189 कोरोनाबाधित आढळले आहेत. काल, भारतात 6650 कोरोनाबाधित आढळले होते. 


मागील 24 तासांमध्ये 387 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, 7286 बाधितांनी कोरोनाला मात दिली आहे. कोरोनावर आतापर्यंत 3,42,23,263 बाधितांनी मात दिली आहे. सध्या देशात 77,032 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 


देशात दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर मागील 82 दिवसांपासून 2 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. सध्या हा दर 0.65 टक्के आहे. तर, आठवड्याला पॉझिटीव्हीटी दर 0.60 टक्के आहे. मागील 41 दिवसांपासून हा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. एका बाजूला कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. तर, दुसरीकडे लसीकरण मोहिमेतही वाढ झाल्याचे दिसते. देशात सध्या 141.01 कोटी डोस देण्यात आले आहेत. 


राज्यात बाधितांच्या संख्येत वाढ


राज्यात  शुक्रवारी 1410  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 868  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या ही एक हजाराहून अधिक नोंदवण्यात येत आहे. नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढेल असे म्हटले जात आहे.  ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  राज्यात आतापर्यंत 65 लाख 1 हजार 243  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.69 टक्के आहे.  





देशात 415 ओमायक्रॉन बाधित


देशात आतापर्यंत 17 राज्यांमध्ये 415 जणांना कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यापैकी 115 जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. भारतात ओमायक्रॉनमुळे आतापर्यंत एकही जणाचा मृत्यू झाला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha