Atal Bihari Vajpayee Birth Anniversary : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' (Good Governance Day 2021)अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. 2014 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती. आज देखील यानिमित्तानं अटलबिहारी वाजपेयींना देशभरात अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींना अभिवादन केलं आहे.






भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जावा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण केली जाते. तसेच अनेक ठिकाणी सेमिनार आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्वाचा परिचय करुन दिला जातो.


अटल बिहारी वाजपेयी : एक जिंदादिल राजकारणी


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशत्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. 1996 साली पहिल्यांदा तर 1998-99 मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. तर 13 ऑक्टोबर 1999 ला तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी हे संयुक्त राष्ट्र संघामध्ये हिंदीत भाषण देणारे पहिले नेते होते. त्यांचं हिंदीवर खूप प्रेम होतं. 27 मार्च 2015 ला त्यांना 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.





16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचं निधन झालं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना 'राईट मॅन इन राँग पार्टी' असं म्हटलं गेलं.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha