Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गात किंचित वाढ झाली आहे, असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे भारतातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिलासादायक आहे. देशात आज 170 नवी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर गेल्या 24 तासांत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रविवारी देशात 163 रुग्ण आढळले होते. त्याच्या तुलनेने आज देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 7 रुग्णांची किंचित वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत चार कोटीहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून अनेक जणांनी या संक्रमणावर मात केली आहे.
Coronavirus in India : आतापर्यंत 5 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोट्यवधी जण कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. गेल्या 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा रुग्ण मध्य प्रदेशातील होता. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 46 लाख 80 हजार 094 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील चार कोटीहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 30 हजार 721 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Covid Vaccination and Booster Dose : लसीकरण, बूस्टर डोस आणि कोविड चाचणीवर भर
जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. चीन, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, थायलँड या देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. चीनमध्ये कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटचा प्रसार होत आहे. तर, अमेरिकेसह इतर देशांमध्ये XBB 1.5 व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारतातही कोरोनाच्या BF.7, XBB1.5 आणि BQ.1.1 व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. भारतात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जात आहे. नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जात आहे.
भारतात कोरोनाचा धोका सध्या कमी असला तरी, केंद्र सरकारकडून खबरदारीची पाऊले उचलण्यात येत आहेत. आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरण करण्याचे आणि बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले जात आहे. आतापर्यंत देशात 220 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
Corona Vaccine Benefts : कोविड लसीमुळे फक्त कोरोना नाही कॅन्सरपासूनही बचाव
कोरोना प्रतिबंधात्मक (Covid Vaccine) लसीमुळे तुमचे फक्त कोरोना विषाणूपासूनच (Coronavirus) नाही, तर रक्ताच्या कर्करोगासारख्या (Cancer) गंभीर आजारांपासूनही तुमचा बचाव करते, असे एका संशोधनात समोर आले आहे. साधारणपणे, रक्ताचा कर्करोग (Blood Cancer) असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. संशोधनात दिसून आले की, कोविड-19 लसीकरण झालेल्या कर्करोगग्रस्त सर्व रुग्णांच्या शरीरात टी सेल्स मोठ्या प्रमाणात सक्रिय आणि मजबूत होते. रुग्णाच्या शरीरातील टी सेल्स सक्रिय झाल्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळापर्यंत टिकून राहू शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या