Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोनाचा आलेख किंचित घटला आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 756 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलतेन आज देशात 41 रुग्णांची संख्या घटली आहे. तर सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट कायम आहे. याशिवाय देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 393 रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. चांगली बाब म्हणजे नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. 


देशात चार कोटीहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त


गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 756  नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी देशात 2 हजार 797 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 40 लाख 54 हजारा 621 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. यामध्ये सर्वात मोठी भूमिका लसीकरणाने बजावली आहे. देशात आजपर्यंत 218 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीमुळे कोरोना विषाणूला पूर्णपणे थोपवता आलं नसलं तरी कोरोना संसर्गाचा वेग मंदावण्यात मदत झाली आहे.






महाराष्ट्रात 480 नवे रुग्ण, 2 जणांचा मृत्यू


आरोग्य विभागाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 480 नवीन रुग्णांची नोद झाली आहे, तर दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन मृत्यू झालेले रुग्ण प्रत्येकी एक-एक मुंबई आणि पुणे शहरातील आहे. 


देशातील कोरोनाचा आलेख घसरता


देशात गेल्या 24 तासांत 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत 5 लाख 28 हजार 799 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाचा संसर्गात चढउतार पाहायला मिळतोय. मात्र, मागील दोन महिन्यांतील आकडेवारी पाहता कोरोनाचा आलेख घसरताना दिसत आहे.