नवी दिल्ली : भारतात जीवघेणा कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढतच आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 499 वर पोहोचला आहे. आतापर्यंत या व्हायरसने 10 लोकांचा जीव घेतला आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त असून सर्वाधिक 97 कोरोना बाधित महाराष्ट्रात आहेत. तर तीन जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्त केरळमध्ये असून एकूण 60 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर केरळमध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या व्हायरसला रोखण्यासाठी देशभरातील 30 राज्य लॉकडाऊन करण्यात आली आहेत. पंजाब, महाराष्ट्र आणि चंडीगढमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
भारतातील इतर राज्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
कर्नाटकात 33 लोकांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशमध्ये 30 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीमध्ये 28 जण कोरोना बाधित आहेत. तर गुजरातमध्ये 29 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्येही कोरोनामुळे 3 जण ग्रस्त असून एकाचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये21 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये 7 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक कठोर निर्बंध लावले आहेत. नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधा कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात 14,500 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंजाब सरकारने कोरोना व्हायरस पसरवण्यापासून रोखण्यासाठी सोमवारपासून कर्फ्यू लागू करण्यात आला असून कठोर पाऊल उचलणारा देशातील पहिलं राज्य आहे. लोक लॉकडाऊनचं पालन करत नव्हते, त्यामुळे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी कर्फ्यूची घोषणा केली आहे. यादरम्यान, आवश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.
पाहा व्हिडीओ : Sharad Pawar on Curfew | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संचारबंदीवर म्हणतात...
लॉकडाऊनबाबत लोक अजूनही गंभीर नाहीत : पंतप्रधान
"अनेक लोक लॉकडाऊनला अजूनही गांभीर्याने घेत नाहीत. कृपया करुन स्वत:ला वाचवा, तुमच्या कुटुंबाला वाचवा, आदेशांचं गांभीर्याने पालन करा. राज्य सरकारांना माझी सूचना आहे की त्यांनी नियम आणि कायदा पाळायला भाग पाडावं," असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
लॉकडाऊनचे नियम मोडीत काढणाऱ्यांवर कारवाई
दिल्ली, मुंबई, बंगळूरू आणि चेन्नई समवेत देशभरात 80 जिल्ह्यांमध्ये ट्रेन आणि राज्यातील सेवा 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्राने राज्य सरकारला लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मुंबईमध्ये सर्व बस सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत.
रेल्वे सेवांनंतर हवाई सेवाही बंद
कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता देशांतर्गत विमान सेवांही बंद करण्यात आल्या आहेत. आज रात्री 12 वाजल्यापासून या सेवा बंद करण्यात येणार आहेत. जगभरात धुमाकळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे आणि विमान सेवांवरही ब्रेक लावण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
सर्वांना दिलासा देणारी बातमी; पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याची टेस्ट निगेटिव्ह
coronavirus | 19 मार्चपर्यंत देशातून व्हेंटिलेटर, मास्कची निर्यात हा तर गुन्हेगारी कट : राहुल गांधी
Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय?
Coronavirus | IIT दिल्लीकडून नवी पद्धत विकसित, कोविड-19ची स्वस्त चाचणी शक्य?
Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात