नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात सध्या भीतीचं वातावरण पसरलं आहे. यामागील कारण म्हणजे, त्या परिसरात पार पडलेली धार्मिक सभा आणि तिथे उपस्थित असलेले हजारो लोक. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात एका धार्मिक यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक लोकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तो परिसर सील करत शेकडो लोकांच्या टेस्ट केल्या. याचदरम्यान, तेलंगणामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला असून हे सहा जण दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे. तर या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी जवळपास 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
काय आहे हे प्रकरण?
रविवारी रात्री उशीरा पोलिसांना माहिती मिळाली की, निजामुद्दीन परिसरात अनेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली आहेत. दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफच्या अधिकारी मेडिकल टीमसह त्या ठिकाणी दाखल झाले आणि तो परिसर सील केल्यानंतर लक्षण आढळून आलेल्या लोकांची तपासणी केली. त्या परिसरातील शेकडो लोकांच्या तपासण्या झाल्या असून सर्वांचे रिपोर्ट्स् मंगळवारी येणार आहेत.
पाहा व्हिडीओ : निजामुद्दीनमध्ये जवळपास 200 जणांना कोरोनाची लागण, धार्मिक कार्यक्रमात सहभाग
परिसर सील करण्यात आला
सध्या संपूर्ण निजामुद्दीन परिसर सील करण्यात आला आहे. या परिसरात तबलीग़-ए-जमातीचं मुख्य केंद्र आहे. तर त्याला लागूनच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आणि त्याशेजारीच ख्वाजा निजामुद्दीन औलिया यांचा दर्गा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ते लोकांमधील लक्षण ओळखून त्यांना हॉस्पिटलमध्ये क्वॉरंटाइन होण्यासाठी पाठवत आहेत.
2000 लोक धार्मिक सभेमध्ये सहभागी
एलएनजेपीचे वैद्यकिय अधिकारी डॉक्टर जे. सी. पासी यांनी सांगितलं की, 'निजामुद्दीन परिसरात रविवारी एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये 85 आणि आज 68 लोकांना आणलं गेलं आहे. हॉस्पिटलमध्ये निजामुद्दीन येथील 153 लोक दाखल असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.' अधिकाऱ्यांनी सांगितलं की, इंडोनेशिया आणि मलेशियासह अनेक देशांमध्ये 2000 पेक्षा जास्त प्रतिनिधी एक ते 15 मार्चपर्यंत तबलीग-ए-जमातमध्ये सहभागी झाले होते.
दरम्यान, तबलीगी जमातीचं मुख्य केंद्र असल्यामुळे फक्त देशातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून येथे लोक येत असतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये, वेगवेगळ्या शहरांमध्ये इस्लाम धर्माच्या प्रचारासाठी पाठवण्यात येतं.
पाहा व्हिडीओ : राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी शासनाची 45 कोटींची घोषणा
सहा लोकांचा मृत्यू
तेलंगणामधील सहा लोकांचा कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला असून या सहा जणांनी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार असं सांगण्यात येत आहे की, 'या सभेमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये तेलंगणाच्या काही लोकांचा समावेश होता.'
दिल्ली सरकारचे एफआयआर दाखल करण्याचे आदेश
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दक्षिण दिल्लीतील निजामुद्दीन पश्चिमेत पार पडलेल्या या कार्यक्रमाचं नेतृत्त्व करण्यासाठी एका मौलाना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक लोकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती.
दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली सरकारने कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी 31 मार्चपर्यंत बंदी घातली होती. तसेच आंदोलनातही 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यासही बंदी घातली होती.
संबंधित बातम्या :
#CoronaUpdate | भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यातच : आरोग्य मंत्रालय
Coronavirus | मुकेश अंबानी यांचं पीएम केअर्स फंडमध्ये 500 कोटींचं योगदान!
लढा कोरोनाशी | दानशूर रतन टाटा यांच्याकडून तब्बल 1500 कोटींची मदत जाहीर
India Lock Down | दिल्लीतलं महास्थलांतर अखेर चार दिवसांनी थांबलं!