Coronavirus : सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असली तरी वाढता मृत्यूचा आकडा हा धडकी भरवणारा आहे. अशातच दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावातच अनेक तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातही इशारा दिला आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 


नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यापैकी अनेक मुलांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आलेली नाहीत. तर एकूण कोरोनाबाधित लहान मुलांपैकी केवळ 2 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली. तसेच या मुलांमध्ये काही लक्षणं प्रामुख्यानं पाहायला मिळत आहेत, ती म्हणजे, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास. या लक्षणांवर उपचार केले जात आहेत, असंही डॉ. पॉल यांनी सांगितलं.


दरम्यान, काही मुलांमध्ये नवी लक्षणंही दिसून येत आहेत. डॉ. पॉल म्हणाले की, कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक लहान मुलांमध्ये 2 ते 6 आठवड्यांमध्ये ताप, त्वचेवर खाज येणं, डोळे लाल होणं, जुलाब, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होणं, यांसारखी लक्षणं दिसून येत आहेत. डॉ. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा मुलांमध्ये कोरोना व्हायरस आढळून आलेला नाही, पण त्यांच्यात आढळून आलेली लक्षणं ही कोरोनाप्रमाणेच आहेत. अशा लक्षणांना Multi System Inflammatory Syndrome असं म्हटलं जातं. 


समिती गठीत 


सरकारनं लहान मुलांमधील ही लक्षणं लक्षात घेऊन एक समिती तयार केली आहे. ही समिती या सर्व लक्षणांचा अभ्यास करत आहे. डॉ. वीके पॉलने सांगितलं की, समिती लवकरच लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या या लक्षणांसाठी गाईडलाइन्स जारी करणार आहे. दरम्यान, त्यांनी हे स्पष्ट केलं की, लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या या लक्षणांवर उपचार उपलब्ध आहेत. त्यांनी सांगितलं की, लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या लक्षणांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व्यवस्था सुदृढ केली जात आहे. 


महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यातील 8 हजार मुलं कोरोनाच्या विळख्यात


महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. पण अशातच आणखी एक धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात ज्या लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली होती, त्याची आकडेवारी समोर आली आहे. जी अत्यंत धक्कादायक आहेत. महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, केवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात जवळपास आठ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 


महाराष्ट्र सरकारनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी कोरोना वॉर्ड तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. सांगली शहरातील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्पेशल कोरोना वॉर्डही तयार करण्यात आला आहे. येथे सध्या पाच मुलांना कोरोनाची लागण झाली असून ते या स्पेशल वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट? एकाच जिल्ह्यातील 8 हजार मुलं कोरोनाच्या विळख्यात