नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनामुळं परिस्थिती भयावह झालेली असतानाच आता उद्योगजगत या राज्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने जामनगर येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पातून दर दिवशी जवळपास 700 टन ऑक्सिजननिर्मिती करुन कोविड प्रभावित राज्यांमध्ये हा साठा पाठवण्यास सुरुवात केली आहे. 


गुजरातमधील जामनगर येथे असणाऱ्या या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये 100 टनच्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत होती, पण आता त्याचं प्रमाण तब्बल 700 टनपर्यंत नेण्यात आलं आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये या ऑक्सिजनचा साठा पोहोचवला जातो, ज्यामुळं जवळपास 70,000 गंभीर रुग्णांना याचा फायदा होतो. सध्याच्या घडीला ऑक्सिजनचाहा पुरवठा 1000 टनपर्यंत नेण्यात येणार असून, त्याबाबतची मुदत मात्र देण्यात आलेली नाही. 


मुख्य म्हणजे जामनगर तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये ऑक्सिजन निर्मिती यापूर्वी केली जात नव्हती. पण, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती पाहता, या ठिकाणी ऑक्सिजननिर्मितीची यंत्रणा सुरु करण्यात आली. जिथं इंडस्ट्रीयल ऑक्सिजनला वैद्यकिय वापरासाठीच्या ऑक्सिजनमध्ये बदलण्यात येतं.


रिलायन्स उद्योगसमूहातून राज्यांना हा ऑक्सिजन उणे 183 तापमानावर टँकरच्या सहाय्यानं मोफत देण्यात येत आहे. रिलायन्ससोबतच इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनंही वैद्यकिय वापरासाठीच्या ऑक्सिजनननिर्मितीत योगदान देण्यास सुरुवात केली आहे. यापैकी इंडियन ऑईल दर दिवशी 150 टन ऑक्सिजनची तर बीपीसीएल 100 टन ऑक्सिजनची निर्मिती करत आहे. 


Remdesivir | केंद्र सरकारचा मोठा निर्णय; रेमडेसिवीर आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील आयात कर हटवला 


नायट्रोजनच्या निर्मितीसाठी असणाऱ्या एअर सेपरेशन प्लांटमध्ये तेलशुद्धीकरण कंपन्यांकडून ही ऑक्सिजन निर्मिती निर्धारित प्रमाणात तेली जाते. इथं, इतर वायूंचं प्रमाण अतीशय कमी करत 99.9 टक्के शुद्ध प्रतिच्या ऑक्जिनची निर्मिती करण्यात येते. जामनगरमध्ये रिलायन्सची सर्वाच मोठी ऑईल रिफायनरी म्हणजेच तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. 


कोविड संकटात रिलायन्सकडून मदतीचा हात 


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या साथीनं रिलायन्स उद्योग समूहानं मुंबईत पहिलं 100 बेड असणारं रुग्णालय सुरु केलं होतं. ज्यानंतर इथं बेडची संख्या 250 वर नेण्यात आली.


याशिवाय कोरोनाबाधितांसाठी विलगीकरणाची व्यवस्थाही त्यांच्याकडून करण्यात आली. प्लाझ्मा थेरेपी, पीपीई कीटसाठीची मदत, टेस्टिंग किटसाठी मदत करण्यासोबतच गरजूंना अन्नपुरवठा करण्यासाठीही रिलायन्स उद्योग समूहानं पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं. इतकच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही या संकटसमयी रिलायन्सकडून सढळ हस्ते मदतीचा हात गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आला होता.