India Coronavirus Cases Today : देशभरात 13 कोटी लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. तरिही कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. दिवसागणिक कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. दररोज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा नवनवे उच्चांक रचत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 295,041 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 1,67,457 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यापूर्वी शनिवारी 259,167 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 56 लाख 16 हजार 130
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 32 लाख 76 हजार 039
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 21 लाख 57 हजार 538
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 82 हजार 553
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 1 लाख 19 हजार 310 डोस
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, काल (मंगळवारी) तब्बल 62 हजार नवीन कोरोना बाधित
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. काल 62 हजार 97 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 54 हजार 224 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 13 हजार 464 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 83 हजार 856 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.14 टक्के झाले आहे. दरम्यान, आज 519 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 1.55 एवढा झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,43,41,736 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 39,60,359 (16.27 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,76,998 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 27,690 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्र आता कोरोना लसी परदेशातून आयात करणार
राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार आता परदेशातून कोरोनाच्या लसी आयात करणार आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांचा फंड आता कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून महाराष्ट्र सरकारने या निर्णयाचे स्वागत केलं आहे. राज्यात आता व्यापक स्तरावर लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याला निधी कमी पडला तर ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांच्या फंडात कपात करण्यात येईल आणि तो फंड लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :