नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या 18 हजार 985वर पोहोचली आहे. आता एकूण 15 हजार 122 लोक उपचार घेत असून 3259 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 603 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट दिसून आली असून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या काळात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.


एका दिवसात सर्वाधिक 705 जण कोरोनामुक्त


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या 705 होती. ही एका दिवसांत ठिक होणाऱ्या रूग्णांची सर्वाधिक संख्या आहे. याचसोबत कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची सरासरी वाढून 14.75 वरून 17.48 झाली आहे. 24 तासांमध्ये 1,336 संसर्ग झालेले नवे रूग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, ज्या जिल्ह्यांमध्ये 28 दिवसांपासून एकही कोरोना बाधित सापडला नाही, त्यामध्ये पद्दुचेरी येथील माहे, कर्नाटकातील कोडागु आणि उत्तराखंड येथील पौढी गढवाल याव्यतिरिक्त राजस्थानमधील प्रतापगढ या जिल्ह्यांचा समावेश आहे.


तर, 23 राज्यांतील 61 जिल्हे असेही आहेत, ज्यामध्ये मागील 14 दिवसांपासून एकही कोरोना बाधित सापडलेला नाही. सोमवारपर्यंत अशा जिल्ह्यांची संख्या 59 होती. आरोग्य मंत्रालयाने कोरोनासाठी राखीव नसलेल्या रूग्णालयांमध्येही आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब लक्षात घेऊन रूग्णालयांसाठी काही निर्देशही जारी केले आहेत.


रॅपिड टेस्टिंग किटचा पुढिल दोन दिवस वापर होणार नाही


चीनमधून भारतात आलेल्या रॅपिड टेस्ट किट्स खराब असल्याची तक्रार राजस्थानातून आली आहे. चीनने पाठवलेल्या रॅपिड टेस्ट किटमधून केलेल्या कोरोनाच्या टेस्ट चुकीच्या येत असल्याने राजस्थान सरकारने या रॅपिड टेस्ट किट्सचा वापर पूर्णपणे थांबवला आहे. त्यामुळे चीनने भारताची फसवणूक केली का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. राजस्थानमधील प्रकार समोर आल्यानंतर याबाबत इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने आदेश दिले आहेत की, चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्ट किटची तपासणी होईपर्यंत कोणत्याही राज्याने या किट्सचा वापर करु नये.


अनेक राज्यांना मिळालेल्या किटमध्ये तांत्रिक अडचणी असल्याची माहिती


भारताने चीनकडून जवळपास साडेनऊ लाख रॅपिड टेस्ट किट्स खरेदी केल्या आहेत. यापैकी साडेपाच लाख किट्स भारताला मिळाल्या आहेत. राजस्थानमधून रॅपिड टेस्ट किट खराब असल्याची तक्रार आल्यानंतर इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. रमन गंगाखेडकर यांनी म्हटलं की, एका राज्यातून रॅपिड टेस्ट किटबाबत तक्रार आल्यानंतर आणखी तीन राज्यांमध्ये याबाबत चौकशी करण्यात आली. रॅपिड टेस्ट किट आणि आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट्स यांच्यात 6 ते 71 टक्क्यांचं अंतर असल्याचं समोर आलं आहे. आणि ही बाब ठीक नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस या किट्सचं मुल्यांकन केलं जाईल, तोपर्यंत या किट्सचा वापर न करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत.


संबंधित बातम्या : 


Corona Test | चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्ट किट्सबाबत तक्रारी, ICMR कडून वापर थांबवण्याच्या सूचना


मुंबई- पुणे भागात लॉकडाऊनबाबतीत सवलती रद्द, वाढलेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश


परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी