Coronavirus in India: कोरोना महामारी संपली असा चुकीचा समज तयार करुन भारताने वेळेआधीच लॉकडाऊन काढल्याने सध्या देश गंभीर संकटात अडकल्याचे अमेरिकेचे वरीष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फौची यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा जबरदस्त तडाखा भारताला बसला आहे. अनेक राज्यात रुग्णालये, आरोग्य कर्मचारी, लस, ऑक्सिजन, औषधे आणि बेड्सच्या तुटवड्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे.


कोरोना प्रतिक्रियांवरील सुनावणी दरम्यान मंगळवारी फौची यांनी सिनेट आरोग्य, शिक्षण, कामगार आणि निवृत्तीवेतन समितीला सांगितले की, “कोरोना आता संपला अशी समजूत घालत भारताने वेळेआधीच लॉकडाऊन काढल्याने सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे डॉ. फौची म्हणाले. डॉ. फौची हे अमेरीकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अ‍ॅन्ड इन्फेक्टीव्ह डिजीजिस (एनआयएआयडी) चे संचालक आहेत आणि अध्यक्ष जो बायडेन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार देखील आहेत.


अमेरिकेने सावधगिरी बाळगण्याची गरज : मरे
सुनावणीच्या अध्यक्षस्थानी, सिनेट सदस्य पॅटी मरे म्हणाल्या की, भारतात हाहाकार उडवूण देणारी कोरोनाची लाट जोपर्यंत जगातून संपत नाही तोपर्यंत अमेरिका ही महामारी संपली असे मानणार नाही. त्या म्हणाल्या की, "बायडेन प्रशासन जागतिक आरोग्य संघटनेत पुन्हा सामील होत असून जागतिक लढाईचे नेतृत्व करीत आहे. 4 जुलैपर्यंत 6 कोटी अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसी इतर देशांमध्ये पोहचवण्याची वचनबद्धता सांगत जागतिक लसीकरणाच्या प्रयत्नांना यशस्वीरित्या यश देत असल्याचे सांगितले. कोरोनामुळे भिविष्यात निर्माण होणाऱ्या उद्रेकाला आवर घालण्यासाठी अमेरिकेत सर्वाजनिक आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याची गरज आहे.