नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाचा प्रकोप थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. देशातील कोरोना बाधितांच्या आकड्यात होणारी वाढ पाहता देशातील लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच कोरोनाच्या संकट ओढावल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. आज आम्ही तुम्हाला कोरोनाच्या संकटकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केव्हा देशातील जनतेशी संवाद साधला आणि त्यांना काय संबोधन केलं याबाबत सांगणार आहोत...
मागील महिन्यात पंतप्रधानांनी 19 मार्च आणि 24 मार्चला देशाला संबोधित केलं आहे. त्यांनी 19 मार्च रोजी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी संकल्प आणि संयम राखण्याचं आवाहन केलं होतं. तसेच 22 मार्च रोजी एका दिवसासाठी 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा कहर रोखण्यासाठी 24 मार्च रोजी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. तसेच 3 एप्रिल रोजी मोदी यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला होता. त्यामधून 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करून दिवे, मेणबत्ती. मोबाईल फ्लॅशची लाइट लावून कोरोनाला हरवण्यासाठी देशातील एकतेचं प्रदर्शन करण्याचं आवाहन केलं होतं.
पाहा व्हिडीओ : 'पीएम केअर फंड'चा सीएसआरमध्ये समावेश, कोरोनाच्या मदतनिधीवरून राजकारण?
कोरोना व्हायरसच्या संकटकाळात पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद
19 मार्च 2020 : 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू' ची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू'ची घोषणा केली होती. पंतप्रधान देशातील सर्व जनतेला आवाहन करताना म्हणाले होते की, 22 मार्च संध्याकाळी 5 वाजता कोरोना व्हायरसशी लढणाऱ्यांना मदत करणाऱ्या डॉक्टरांसह मेडिकल टीमचे आभार मानण्यात येतील. त्यांचे आभार मानण्यासाठी टाळ्या, थाळ्या किंवा घंटानाद करा.
24 मार्च 2020 : 25 मार्चपासून 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊनची घोषणा
पंतप्रधन नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी 24 मार्च रोजी देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती.
29 मार्च 2020 : मन की बात, लॉकडाऊनमुळे जनतेला झालेल्या त्रासाची मागितली माफी
29 मार्च रोजी मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशात लॉकडाऊन लागू करण्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, परंतु ही काळाची गरज होती. पंतप्रधान मोदींनी जनतेला आवाहन केलं होतं की, त्यांनी लॉकडाऊनचं पालन करावं आणि स्वतःसह आपल्या कुटुंबालाही कोरोनापासून वाचवावं.
3 एप्रिल 2020 : व्हिडीओ संदेश, 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे लावण्याचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं होतं की, 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता देशभरातील लोकांनी रात्री 9 मिनिटांसाठी आपल्या घरातील दिवे बंद करावे आणि त्याबदल्यात दिवे किंवा मेणबत्या लावाव्यात. यामागील हेतू देशातील एकता वाढवण्याचा होता..
संबंधित बातम्या :
Coronavirus | लॉकडाऊन-2 मध्ये 'हे' बदल होऊ शकतात? पंतप्रधान मोदींच्या भाषणाआधी चर्चांना उधाण