नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आज या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी 10 वाजता नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. अशातच पंतप्रधान मोदी देशातील लॉकडाऊन वाढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांना सुट देण्याची शक्यता
देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 एप्रिल रोजी दुसऱ्यांदा देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. यादरम्यान जास्तीत जास्त नेत्यांनी देशातील लॉकडाऊन वाढवण्यासाठी सहमती दर्शवली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील लॉकडाऊनचा पार्ट-2, हा सध्याच्या लॉकडाऊनपेक्षा थोडा वेगळा असू शकतो. म्हणजेच, यामध्ये काही क्षेत्रांना सूट मिळू शकते. पंतप्रधान आपल्या आजच्या भाषणात याबाबत घोषणा करू शकतात.
शेतकऱ्यांसाठी होऊ शकते मोठी घोषणा
लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश बंद होता. अशावेळी शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. बाजारपेठाच बंद करण्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा माल विकला जात नव्हता. सध्याचा काळात शेतातली पिकं कापणीला येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करत शेतात काम करण्याची परवानगी मिळू शकते.
पाहा व्हिडीओ : 'पीएम केअर फंड'चा सीएसआरमध्ये समावेश, कोरोनाच्या मदतनिधीवरून राजकारण?
जीवनावश्यक सामानांची पूर्तता करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण घोषणा?
पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे की, लॉकडाऊनच्या काळातही जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. योग्य वेळी, योग्य दरात लोकांना सामानाचा पुरवठा झाला पाहिजे. राज्य सरकारचाही जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी, तसेच कर्मचारी, मजूरांना आणण्यासाठी विशेष ट्रेन किंवा बस सोडण्याचा मानस आहे. यामागील मुख्य हेतू म्हणजे, जीवनावश्यक वस्तूंच्या उद्योगांशी निगडीत मजूर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता भासू नये हाच आहे. याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
देशांच चार झोनमध्ये वर्गीकरण करून घेऊ शकतात निर्णय?
सध्या भारतातील 300 जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच इतर जिल्ह्यांना काही सवलती मिळू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता, देशाला चार भागांमद्ये वर्गीकरण होऊ शकतं. ज्यामध्ये रेड झोन, ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि येलो झोन अशी नावं देण्यात येऊ शकतात.
रेड झोनमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव जास्त असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल. तर कोरोना बाधितांची संख्या मध्यम प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांचा समावेश ऑरेंज झोनमध्ये होऊ शकतो. या दोन्ही झोनमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात येईल. येलो झोनमध्ये लॉकडाऊनमधून काही अंशी सूट देण्यात येईल. पण त्यासाठी काही अटी असतील. तसेच ग्रीन झोन असणाऱ्या क्षेत्रात जिथे कोरोनाचा संसर्ग नाही अशा जिल्ह्यांचा समावेश होऊ शकतो. येथे लॉकडाऊनपासून सुट मिळू शकते.
संबंधित बातम्या :
Corona Update | कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाची लागण, 'या' रुग्णांवर डब्लूएचओची नजर