Coronavirus India: जीवघेण्या कोरोना विषाणूनं बराच काळ संपूर्ण जगाची पाठ सोडलेली नाही. विकसीत देशांपासून ते अगदी विकसनशील देशांपर्यंत सर्वत्रच कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. भारतातही चित्र वेगळं नाही. मागील बऱ्याच दिवसांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्याचं पाहायला मिळत होतं. पण, आता मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट ही धीम्या गतीनं का असेना पण ओसरत असल्याचं दिसत आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांमध्ये देशात 1 लाख 636 नवे कोरोनाबाधित आढळले. तर, 2427 नागरिकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. इतकंच नव्हे तर, 1 लाख 74 हजार 399 कोरोनाबाधितांनी या विषाणूच्या संसर्गावर मात केली. 


61 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या 
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील 24 तासांत निदान झालेल्या कोरोनाबाधितांचा आकडा मागील 61 दिवसांमधील सर्वात कमी असल्याचं कळत आहे. यापूर्वी 7 एप्रिलला इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली होती. देशातील दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट आता 6.34 टक्क्यांवर पोहोचला आहे. 


Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर 


एकूण आकडेवारी किती? 
एकूण कोरोनाबाधित - 2 कोटी 89 लाख 9 हजार 975
एकूण कोरोनामुक्त - 2 कोची 71 लाख 59 हजार 180
एकूण मृत्यू - 3 लाख 49 हजार 186
एकूण सक्रिय रुग्ण - 14 लाख 01 हजार 609






देशातील लसीकरणालाही काहीसा वेग 
देशात लसींच्या तुटवड्यामुळं काहीसं  थंडावलेलं लसीकरण पुन्हा एकदा अंशत: वेगानं सुरु झालं आहे. मागील 24 तासांत 13 लाख 90 हजार 916 लसी देण्यात आल्या. ज्यामुळं एकूण लसीकरणाचा आकडा 23 कोटी 27 लाख 86 हजार 482 वर पोहोचला आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार रविवारच्या दिवसभरात देशात 15 लाख 87 हजार 589 नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले.