Breaking News LIVE : Maharashtra Corona Update : आज 21,081 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात 10,219 नवीन रुग्णांचे निदान

Breaking News LIVE Updates, 7 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Jun 2021 07:40 PM
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिष्टमंडळ सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची भेट घेणार

सकाळी 7 वाजता मुंबईहून दिल्लीसाठी रवाना होणार,  सकाळी 9 वाजता दिल्ली विमानतळावर दाखल होणार, 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे असं शिष्टमंडळ असणार,  सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची भेट घेणार

आज 21,081  रुग्ण बरे होऊन घरी,  राज्यात 10,219 नवीन रुग्णांचे निदान

Maharashtra Corona Update : आज 21,081  रुग्ण बरे होऊन घरी,  राज्यात 10,219 नवीन रुग्णांचे निदान तर 154 कोरोनाबाधितांचा मृत्यू #maharashtra #corona 

आता म्युकर मायकोसिसच्या लिपोसोमल इंजेक्शन काळाबाजार उघड 

रेमडेसिवीर इंजेक्शन नंतर आता लिपोसोमल अम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झालाय. म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी हे इंजेक्शन महत्वपूर्ण असतंय. त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या नर्सला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोशी येथील पालिकेच्या कोव्हिड सेंटरमध्ये ही महिला नर्स म्हणून काम करत असल्याची माहिती आहे. मूळ सहा हजार रुपयांचे इंजेक्शन ती बावीस हजारांना विक्री करत होती. पोलिसांनी डमी ग्राहक बनून हा काळाबाजार समोर आणलाय. एमआर म्हणून कार्य करणाऱ्या तिच्या मित्राने तिला हे इंजेक्शन दिल्याचं तपासात समोर येतंय.

नैऋत्य वाऱ्यांची मजल अद्यापही अलिबागपर्यंतच, मान्सून आज मुंबईत दाखल होणार नाही : हवामान विभाग

मुंबईत आज मान्सून दाखल होणार अशी शक्यता होती, मात्र नैऋत्य वाऱ्यांची मजल अद्यापही अलिबागपर्यंतच पाहायला मिळत आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून आज मान्सून पुढे सरकला नसल्याचं सांगण्यात आले आहे. परिस्थिती जैसे थे आहे. काल मान्सूनची उत्तरसीमा पुण्याच्या पुढे करमाळा, औसामार्गे मेडक, नालगोंडा, रेंताचिंतला, श्रीहरिकोटावरुन पश्चिम बंगालमधील बागडोगरापर्यंत जात होती. आज देखील मान्सून तिथे आहे. दरम्यान, असं असलं तरी मान्सूनने संपूर्ण ईशान्य भारत व्यापला आहे. तर राज्यात मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर कोकणातील ठाणे, पालघर परिसरातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला संबोधणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता पंतप्रधान देशवासियांसोबत संवाद साधणार आहे. मोदी काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. 

सिंधुदुर्गातील मालवण मध्ये तोक्ते वादळाने झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पहाणी





सिंधुदुर्ग : तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे. या समितीने मालवण तालुक्यातील किनारपट्टी भागातील नुकसानीची पाहणी केली. या केंद्रीय समितीच्या सदस्यांनी आचरा, मालवण, चिवला बीच, वायरी, तारकर्ली, देवबाग या नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. या समिती मध्ये अर्थविभागाचे प्रमुख अभय कुमार, केंद्रीय कृषी खात्याचे सिंग, ऊर्जा विभागाचे प्रमुख जे.के. राठोड, केंद्रीय मत्स्य विभागाचे प्रमुख अशोक कदम यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते वादळामुळे मोठी हानी झाली आहे. त्याचा केंद्रीय समितीचा दौरा करत असून याचा योग्य तो अहवाल केंद्राकडे सादर करणार आहेत.


 

 



 


केंद्र सरकारच्या बँकिंग अॅक्टमधील दुरुस्तीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून उपसमिती स्थापन

केंद्र सरकारच्या बँकिंग अॅक्टमधील दुरुस्तीचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने उपसमितीची स्थापना केली आहे. सहकारी बँका जगवण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी ही समिती काम करणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील या उपसमितीचे अध्यक्ष असतील. तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अमित देशमुख आणि विश्वजित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ आणि राजेंद्र शिंगणे तर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे आणि शंकरराव गडाख यांचा उपसमितीत समावेश असेल. या उपसमितीची पहिली बैठक उद्या (8 जून) होणार आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाची बैठक घेतली होती, त्यावेळी समिती बनवावी अशी सूचना पवार यांनी केली होती. या उपसमितीत तज्ज्ञ देखील असणार आहे. सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर,  विश्वास नागरी सहकारी बँकेचे चेअरमन विश्वास ठाकूर आणि सहकार आयुक्त अनिल कवडे यांचा या उपसमितीत समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात भेट; महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यात भेट झाल्याची माहिती मिळत आहे. महामंडळ वाटपावर चर्चा झाल्याचं कळतंय. महाविकास आघाडी सरकारला महामंडळ वाटपाचा मुहूर्त लवकरच मिळणार असून येत्या पंधरा दिवसात महामंडळ वाटपाची प्रक्रिया स्पष्ट होणार आहे. राज्यात एकूण महामंडळ, प्राधिकरण, समिती शंभरहून अधिक आहेत. प्राथमिक स्वरूपातील वाटप पूर्ण झाला असून तिन्ही पक्षांमध्ये महामंडळाचे समान वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेसची धडक, भीषण अपघातात 30 प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेसची धडक झाली आहे. या भीषण अपघातात 30 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच अपघात भीषण असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. 

देशांतर्गत विमान प्रवासासाठी rt-pcr टेस्टची अट रद्द होऊ शकते?

देशांतर्गत विमान प्रवासासाठी rt-pcr टेस्टची अट रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना विमान प्रवासासाठी परवानगी दिली जाऊ शकते. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालय तज्ञांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तसचे आरोग्य हा विषय राज्यांचा आहे आणि त्यांना rt-pcr रिपोर्ट मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे याबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानं सांगितलं आहे. 

राज्यात आजपासून अनलॉकची सुरुवात

जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे

पार्श्वभूमी

राज्यात आजपासून अनलॉकची सुरुवात
जवळपास गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असलेला महाराष्ट्र हळूहळू अनलॉक होत आहे. त्यामुळे, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र, सरकारने 5 टप्प्यात राज्य अनलॉक करण्याबाबत नियमावली आखली आहे. जिल्ह्यांचा पॉझिटीव्हीटी रेट लक्षात घेत अनलॉकचा निर्णय घेण्यात येणार असून, कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या धर्तीवर निर्बंध काय आणि किती प्रमाणात शिथिल केले जातील याबाबत प्रशासनाकडून आदेश देण्यात येत आहेत. 


मुख्यमंत्र्यांचा कोर्लई येथील घोटाळा लपविण्यासाठी अनिश्चित काळासाठी गावबंदी; किरीट सोमय्या यांचा आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथे खरेदी केलेल्या जमीन व्यवहार प्रकरणी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी यासंदर्भात रेवदंडा पोलिसांना पुरावे सादर केले होते. परंतु , यानंतरही या संदर्भात कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला होता. तर , या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत करण्याची मागणी देखील सोमय्या यांनी केली होती. 


राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथील केलेले नाहीत, काटेकोर काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह  यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.    


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.