नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनाची रुग्णसंख्या ही 40 हजारांच्या आत आली आहे. परंतु मृतांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ताजी आकडेवारी जारी केली असून त्यानुसार, देशात गेल्या 24 तासात 38,628 नवीन रुग्णांची भर पडली असून 617 लोकांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 40,017 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
त्या आधी शुक्रवारी देशात 44,643 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 464 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याचवेळी 41,096 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.
लसीकरणाने 50 कोटींचा टप्पा ओलांडला
भारतातल्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 50 कोटी डोस देण्याचा विक्रम झाला आहे. यामध्ये लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचाही समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या वृत्तानुसार, देशात आतापर्यंत कोरोनाच्या लसीचे 50 कोटी 10 लाख 48 हजार 866 डोस देण्यात आले आहेत. देशात 21 जून पासून 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
शुक्रवारी एकाच दिवशी देशात 43.29 लाख डोस देण्यात आले. त्यामध्ये 22 लाख 93 हजार लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला असून 4 लाख 32 हजार लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 17 कोटी 23 लाख लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून एक कोटी 12 लाख लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
राज्याची स्थिती
राज्यात शुक्रवारी 5539 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 859 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 30 हजार 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे.
राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे 187 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 35 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74 हजार 483 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (10), हिंगोली (80), अमरावती (90), वाशिम (93), गोंदिया (92), गडचिरोली (28) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14,834अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Aditi Ashok : गोल्फमधील भारताच्या आशा मावळल्या, अदिती अशोकचं पदक थोडक्यात हुकलं, चौथ्या स्थानावर राहिली अदिती
- Amazon-Future Group Deal : मुकेश अंबानींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, रिलायन्स-फ्यूचर कराराला स्थगितीचा आदेश
- बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमागचं सत्य! गटारीची पार्टी करताना मद्यधुंद अवस्थेत मुंबई पोलिसांना केले हॉक्स कॉल, दोघे ताब्यात