मुंबई : मुंबईच्या सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवेमुळे खळबळ उडाली होती. एका निनावी कॉलच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती.  या प्रकरणाची माहिती आता समोर आली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशन, दादर रेल्वे स्टेशन आणि बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या पश्चिम उपनगरातील बंगल्यावर बॉम्ब असल्याचा दावा करणाऱ्या दोन मद्यधुंद इसमांनी खोटे कॉल करुन मुंबई पोलिसांनी झोप उडवली.  राजू अंगारे आणि रमेश शिरसाट अशी या दोघांची नावं आहेत. सर्वात आश्चर्याची बाब अशी कि,  या दोघांनी असा दावा केला की मुंबई पोलीस किती सतर्क आहेत हे तपासण्यासाठी त्यांनी हा कॉल केला होता.


मुंबईतील सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या अफवांमुळं खळबळ


शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास मुंबई पोलिसांना कॉल आला की मुंबईमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत. त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी आपली संपूर्ण यंत्रणा या कॉलची शहानिशा करण्यासाठी लावली बीडीडीएस (बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल  स्कॉड) डॉग स्क्वड अशी विविध पथक बॉम्बच्या शोधासाठी सज्ज करण्यात आली. 


शहरातील पोलीस स्टेशन यांनाही सतर्क करण्यात आलं आणि त्यांनाही कॉलमध्ये सांगण्यात आलेल्या ठिकाणांवर सज्ज राहण्यास सांगितले आणि त्यांनी सुद्धा जागेची पाळत सुरू केली. मात्र त्यांच्या हाती काही लागलं नाही कारण जो कॉल आला होता तो हॉक्स कॉल (खोटा कॉल) होता.


पोलिसांनी दिलेल्या नंबरवर जेव्हा फोन केला तेव्हा त्याने समोरून आपण व्यस्त असल्याचं सांगितलं आणि नंतर मोबाईल स्विच ऑफ केला त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी त्या कॉल करणार करणाऱ्याचा शोध सुरू केला.


पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा लोकेशनच्या आधारावर त्यांचा शोध सुरू केला आणि त्यांना कल्याण शिळफाटावरून ताब्यात घेतलं. जेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा  राजू अंगारे आणि रमेश शिरसाट हे दोघे गटारी साजरी करत पार्टी करत होते. हे दोघेही मित्र असून डोंबिवली येथे राहतात आणि मद्यधुंद अवस्थेत त्यांनी मजा म्हणून हा खोटा कॉल पोलिसांना केला होता. पोलिसांनी जेव्हा त्यांची चौकशी केली तेव्हा या दोघांनी आपण मद्यधुंद अवस्थेत पोलिसांची सतर्कता तपासण्यासाठी हा कॉल केल्याची त्यांनी कबुली दिली.