Tokyo Olympics 2020 LIVE Aditi Ashok : टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्फमधील भारताच्या अदिती अशोकचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अदितीचं पदक थोडक्यात हुकलं असून ती चौथ्या नंबरवर राहिली. अदिति अशोक ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सर्वोत्तम खेळी करणारी गोल्फर झाली आहे. शेवटच्या शॉटपर्यंत अदिती पदकाच्या रेसमध्ये होती. मात्र शेवटी अटीतटीच्या लढतीत अदिती पदकापासून वंचित राहिली. गोल्फमधलं गोल्डमेडल अमेरिकेच्या खेळाडूनं जिंकलं आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या अदिती अशोक या खेळाडूनं भारताकडून दमदार खेळी करत या खेळ प्रकारात भारताला पदकाच्या जवळ नेलं. भारतीय महिला गोल्फपटू अदिती अशोकनं अंतिम फेरीत दमदार खेळी केली. गोल्फ सारख्या हायप्रोफाईल खेळात भारतीय खेळाडूची ताकद अभिमानास्पद आहे. अदिती अशोकच्या या कामगिरीमुळं गोल्फ प्रकाराकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
Aditi Ashok : गोल्फमध्ये अदिती अशोकची कमाल, भारताला गोल्फमध्ये पदकाच्या जवळ घेऊन जाणारी अदिती
कोण आहे अदिती अशोक
29 मार्च 1998 रोजी जन्मलेली अदिती अशोक ही भारतीय गोल्फ खेळाडू आहे.अदितीचा जन्म बंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून गोल्फचे आकर्षण असलेली अदिती कर्नाटक गोल्फ असोसिएशनच्या हिरव्यागार गोल्फ कोर्सवर सराव करायची. आपल्या वडिलांसोबत अदिती या गोल्फ कोर्सवर जायची , जिथे ती लवकरच गोल्फमध्ये कुशल झाली. अदितीचे वडील पंडित गुडलामानी अशोक हेच तिचे कॅडी आहेत. एकीकडे फ्रँक अँथनी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण आणि दुसरीकडे गोल्फ कोर्सवर सराव, अशी दुहेरी कसरत अदिती करत होती. पुढे ती स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.
रिओ ऑलिम्पिकमध्येही केलं होतं भारताचं प्रतिनिधित्व
अदितीने रिओ ऑलिम्पिकमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. रिओमध्ये अदिती अशोकला 41व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. ऑलिम्पिकमध्ये 112 वर्षांनी पुनरागमन केलेल्या गोल्फमध्ये त्यावेळी केवळ 18 वर्षाची असलेल्या अदितीने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ती सर्वात लहान खेळाडू होती.