Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा घटली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच रविवारी दिवसभरात 5 हजार 910 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याच्या आदल्या दिवशी शनिवारी 6 हजार 809 कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे रविवारी तुलनेनं रुग्णांची संख्या 899 ने घसरली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाल्याची बाब दिलासादायक आहे. याआधी 31 ऑगस्ट 2022 रोजी कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांवर पोहोचली होती. तेव्हा 5 हजार 439 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. 


आतापर्यंत 5 लाख 28 हजार 7 रुग्णांचा मृत्यू


देशात गेल्या 24 तासांत 7 हजार 34 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशातील उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. सध्या देशात 53 हजार 974 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 






रविवारी महाराष्ट्रात 1205 नव्या कोरोना रुग्णांची नोंद


राज्यात गेल्या 24 तासांत 1205 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे.  रविवारी दिवसभरात एकूण 1532 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर तीन कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात 1272 कोरोना रुग्णाची भर पडली होती. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1532 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79,48, 226 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.07 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 1205 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. 


मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण


आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या आठ हजार 364 सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक 2949 सक्रीय रुग्ण आहेत. त्याशिवाय, ठाणे 1882 आणि पुणे 1735 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी एक हजार पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. जळगावमध्ये सर्वात कमी सक्रीय रुग्ण आहेत. जळगावमध्ये तीन सक्रीय रुग्ण आहेत. नंदूरबारध्ये पाच सक्रीय रुग्ण आहेत. हिंगोलीमध्ये सहा सक्रीय रुग्ण आहेत.