Coronavirus Cases Today in India : देशात दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना विषाणूचा हा वाढता प्रादुर्भाव ही एक चिंताजनक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात 2 हजार 139 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद आणि 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याआधीच्या दिवशी देशात 1 हजार 957 नवीन रुग्णांची नोंद आणि 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सलग तीन दिवस कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर आज पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख वाढला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. 


कोरोनाची पाचवी लाट येणार?


एकीकडे देशात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. दुसरीकडे चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे देशातही आता कोरोनाच्या पाचव्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात चौथ्या लाटेनंतर आता कुठे कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत होता. मात्र, कोरोना रुग्णसंख्येतील चढउतार कायम आहे. 






कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त


देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी चढउतार होत असला तरी, दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात कोरोनाचे 26 हजार 292 रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासांत 3,208 कोरोनारुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत देशात 4 कोटी 40 लाख 63 हजार 406 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 






मागील 24 तासांत 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू


देशात गेल्या 24 तासांत म्हणजे मंगळवारी दिवसभरात 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 5 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्याने नोंद झालेल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे देशातील एकूण कोरोनाबळींचा आकडा 5 लाख 28 हजार 835 वर पोहोचला आहे.