Coronavirus Cases Today in India : देशात पुन्हा एकदा दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यासोबतच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आदल्या दिवसाच्या तुलनेत घटली असली, तरी दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळणे, ही चिंताजनक बाब आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 678 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल देशात 2,786 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेनं 108 रुग्णांची घट झाली आहे. पण देशातील मागील काही दिवसांतील आकडेवारी पाहता कोरोना संसर्गात चढउतार पाहायला मिळत आहे.

Continues below advertisement


ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटने धोका वाढवला


शास्त्रज्ञांना कोरोनाच्या ओमिक्रॉन या संसर्गजन्य प्रकाराने नवे व्हेरियंट सापडले आहेत. चीनमध्ये शास्त्रज्ञांना ओमिक्रॉन दोन नवीन सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 आढळून आले आहेत. हे दोन्ही सबव्हेरियंट अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कोरोना लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. 






सक्रिय रुग्णांचा आकडा 26 हजारांवर


देशातील कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या 26 हजारांवर आहे. मागील तीन दिवसांत ही संख्या 26 हजारांच्या खाली आलेली नाही. त्याआधी सातत्याने कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत होती. तर देशात 2,594 रुग्ण गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना सकारात्मक दर 1.08 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट 1.05 टक्के इतका आहे.






देशात आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 23 हजार 997 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापैकी 5 लाख 28 हजार 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर इतर रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत देशव्यापी कोरोना लसीकरणात 219 कोटीहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत.


कोरोनाच्या व्हेरियंटविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीजचा शोध


संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान (Coronavirus घातले आहे. या कोरोना महामारीने शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. कोरोना सुरू झाल्यापासून जभरातील संशोधक कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीजचा शोध घेत आहेत. या अँटीबॉडीज केवळ विषाणूच्या एका स्ट्रेनशीच नव्हे तर कोरोनाच्या सर्वच प्रकारांशीही लढू शकतो. दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी (ICGEB) मधील शास्त्रज्ञांनी कोरोनाविरोधात लढणाऱ्या एका अँटीबॉडीचा शोध लावला आहे. 002-S21F2 असे या अँटीबॉडीजचे नाव आहे.