Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या चार महिन्यांमध्ये कोरोना संसर्गात पहिल्यांदा मोठी घट झाली आहे. जून महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत नव्या 3 हजार 230 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात 32 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्ण दराहून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. देशात सध्या पॉझिटिव्हिटी रेट 1.18 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.72 टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे. यामध्ये दिलासादायक बाब समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घसरली आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच सोमवारी दिवसभरात 3 हजार 230 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याआधी 1 जून रोजी हा आकडा तीन हजारांवर होता. त्यानंतर या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 1 जून 2022 रोजी देशात 3712 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती.
देशातील कोरोनाचा आलेख घटतोय
देशातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस घटताना पाहायला मिळत आहेत. तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. देशात सध्या 42 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. आधीच्या दिवशी सोमवारी ही संख्या 43 हजारांवर होती. तर त्याआधी रविवारी उपचाराधीन रुग्णांची संख्या 44 हजारांवर होती. सध्या देशात 42 हजार 358 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे भारतात 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण 5 लाख 28 हजार 562 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना रुग्ण बरे होण्याचे अधिक आहे. सध्या हा दर 98.13 टक्क्यांवर आला आहे. राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सोमवारी 256 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 315 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याशिवाय दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.