Coronavirus Cases Update : सध्या देशात कोरोना व्हायरसच्या (Covid-19) प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 1675 रुग्णांची नोंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 23 मे रोजी कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 2022 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 4,31,40,068 व र पोहोचली आहे. अशातच, गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 14,481 वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 31 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5,24,490 वर पोहोचली आहे. अशातच, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा राष्ट्रीय दर 98.75 टक्के आहे. कोरोना संसर्गाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील दैनिक संसर्गाचा दर 0.41 टक्के आहे आणि साप्ताहिक संसर्ग दर 0.49 टक्के आहे. देशात एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 4,26,00,737 वर पोहोचली आहे. तर देशात या महामारीमुळे मृत्यूचं प्रमाण 1.22 टक्के नोंदवलं गेलं आहे.
राज्यात सोमवारी 208 रुग्णांची नोंद तर 133 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 208 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये एकूण 133 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,33,176 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.
राज्यात 1978 सक्रिय रुग्णांची नोंद
राज्यात आज एकूण 1978 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1370 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये, 284 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
सोमवारी मुंबईत 150 नव्या रुग्णांची भर
मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी मुंबईत 150 नव्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी सहा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी 74 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.