बेळगाव : हुबळीजवळील तारीहाळ बाय पास इथे बस आणि ट्रक अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला. अपघाताची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.


नॅशनल ट्रॅव्हलची बस रात्री साडे बारा ते एकच दरम्यान कोल्हापूरहून बंगलोरला निघाली होती. तर तांदळाची वाहतूक करणारा ट्रक मुंबईकडे निघाला होता. बस चालकाने समोरील ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. यामध्ये ट्रक ड्रायव्हर, क्लिनर आणि बसमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातात पाच जणांनी जागीच प्राण सोडले तर हॉस्पिटलमधे उपचार सुरु असताना बसमधील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींना हुबळी येथील केआयएमएस हॉस्पिटलमधे हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. 


ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात
अपघाताचे वृत्त कळताच हुबळी पोलीस आयुक्त लभुराम यांनी अपघात झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांच्या माहितीनुसार बस कोल्हापूरहून बंगळुरुला जात होती. तेव्हा मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान धारवाडकडे जाताना बस एका ट्रॅक्टरला  धडकली. बस चालत ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात असताना हा अपघात झाला. या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. परंतु मृत हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील असू शकते कारण बस बंगळुरुला जात होती. पोलिसांकडू मृत आणि जखमींची ओळख पटवून नातेवाईकांना कळवलं जात आहे.


जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात
जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात. जगभरातील वाहनांपैकी केवळ एक टक्का वाहने भारतात आहेत, परंतु रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंपैकी 11 टक्के मृत्यू भारतात आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत रस्ते अपघातात सातत्याने घट होत आहे. याचं कारण, चांगले रस्ते आणि अपघात रोखण्याबाबत शासनाच्या वतीने जनजागृती आणि कडक मोहीम. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते.