नवी दिल्ली : गेल्या महिन्यापासून भारतातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येतंय. या काळात कोरोना लसीचे कित्येक कोटी लस देण्याच्या विक्रमाची नोंद झाली. आता त्यात आणखी एका सकारात्मक बातमीची भर पडली आहे. भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने 70 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ही माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे 70 कोटी 67 लाख 36 हजार 715 डोस देण्यात आले आहेत. तर राज्यात सहा कोटी 40 लाख 78 हजार 584 इतके डोस देण्यात आले आहेत.


भारताने साध्य केलेल्या या लसीकरणाच्या टप्प्याचे कौतुक करताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोना लसीकरणाचा 70 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हे यश साध्य करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन." 


 






Maharashtra Corona Update : राज्यात आज  3, 898 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 86 रुग्णांचा मृत्यू


देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या 70.67 कोटी लसींपैकी 54.09 कोटी लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर 16.57 कोटी लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. गेल्या 13 दिवसात एकूण 10 कोटी लसी देण्यात आल्या आहेत.


गेल्या 11 दिवसात भारतामध्ये एकाच दिवसात एक कोटीहून अधिक डोस देण्याचा विक्रम तीनवेळा साध्य झाला आहे. मंगळवारी एकाच दिवसात 1.13 कोटी लोकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. येत्या काळात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्यात येणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. 


 






महाराष्ट्रातही 6.40 कोटींचा टप्पा पार
देशाप्रमाणे राज्यातही लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलाच वेग घेतलेला दिसून येतोय. राज्यात आतापर्यंत सहा कोटी 40 लाख 78 हजार 584 इतके डोस देण्यात आले आहेत. त्यामध्ये 4.64 कोटी लोकांना पहिला डोस देण्यात आला असून 1.76 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 


Corona Vaccination : देशात लसीकरणाचा विक्रम; एकाच दिवसात एक कोटीहून अधिक नागरिकांना डोस