मुंबई : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 2, 696 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 062 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 77 हजार 954 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.27 टक्के आहे.
राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 096 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (11), नंदूरबार (1), धुळे (3), जालना (36), परभणी (61), हिंगोली (15), नांदेड (11), अकोला (24), वाशिम (08), बुलढाणा (09), यवतमाळ (09), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (1), गडचिरोली (16 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 35 हजार 955 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,47,006 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,370 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 90, 74, 660 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,56, 657(11.1 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 405 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 405 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 495 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,20,487 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4713 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1169 दिवसांवर गेला आहे.
गेल्या 24 तासात देशात 24 हजार रुग्णांची नोंद
देशात एकीकडे कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असला तरी दुसरीकडे अद्याप कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत नसल्याचं दिसून येतंय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 24 हजार 354 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 234 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्येत मात्र हळूहळू घट होताना दिसत असून ती आता 2 लाख 73 हजार 889 इतकी झाली आहे. त्या आधी गुरुवारी देशात कोरोनाच्या 26 हजार 727 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 277 लोकांचा मृत्यू झाला होता. देशातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून शुक्रवारी कोरोनाचे 69 लाख 33 हजार 838 डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत एकूण 89 कोटी 74 लाख 81 हजार 554 इतके डोस देण्यात आले आहेत.