नवी दिल्ली : राष्ट्रव्यापी लसीकरणाच्या 61 व्या दिवशी, बुधवारपर्यंत देशात एकूण 3.64 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामध्ये 12,10,498 लोकांना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर 1,92,710 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. 


बुधवारी 41,803 आरोग्य कर्मचारी आणि 63,617 फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाच्या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचवेळी 53,542 आरोग्य कर्मचारी आणि 1,39,168 फ्रन्टलाईन वर्कर्सना कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा डोस देण्यात आला आहे. त्याचवेळी 60 वर्षावरील 84,918 लाभार्थ्यांना आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असणाऱ्या 2,20,160 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.


45 वर्षापुढील सर्वांचं सरसकट कोविड लसीकरण करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी


आतापर्यंत देशात जवळपास एक कोटी 14 लाख 73 हजार 946 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच एक कोटी 10 लाख 60 हजार 951 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. 


देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला वेळेत रोखणे गरजेचं आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचं पालन करणे गरजेचं आहे. गेल्या वर्षभरातील कोरोनाविरोधातील लढाईचं यश बेजबाबदारीत बदललं गेलं नाही पाहिजे. टेस्टिंग आणि ट्रेसिंग वेळेत होणे गरजेचं आहे. अनेक राज्यांमध्ये रॅपिड टेस्टवर जोर दिला जात आहे. मात्र आरटीपीसीआर टेस्ट 80 टक्क्यांच्यावर ठेवायला हव्यात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.


कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यावरही विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर कोरोना झाल्याच्या काही घटना घडल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणलं. तसेच राज्यात पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि त्या जोडीनेच मास्क वापरत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे या आरोग्याच्या नियमांवर जास्तीत जास्त भर देणार आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. बाधितांमध्ये तरुण गट पण आहे हे लक्षात घेऊन ४५ वर्षे वयोगटापासून पुढे सहव्याधी असो किंवा नसो, सर्वाना लसीकरण करावे अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. 


Corona Vaccine Drive | राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा, आठवड्याला 20 लाख डोस आवश्यक : राजेश टोपे