नवी दिल्ली: कोरोना काळाच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे पहायला मिळाले. जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाला आज भारतात प्रारंभ झाला आहे. त्याचे शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं.


कोरोना काळात आरोग्य कर्मचारी, कोरोना योध्ये आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ज्या पध्दतीने सेवा बजावली आणि ज्या पध्दतीने बलिदान दिले त्याच्या आठवणीने पंतप्रधान मोदी भावुक झाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनादरम्यान कोरोना काळातल्या कटू आठवणींना उजाळा देताना भावुक झाले. ते म्हणाले की, "या काळात मुलांना आपल्या आईपासून वेगळं करण्यात आलं. आईची इच्छा असूनही तिला आपल्या मुलांना भेटता येत नव्हतं."


Coronavirus Vaccination PM Modi Speech | कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; पंतप्रधान म्हणाले, 'दवाई भी, कड़ाई भी'


जे लोक आपल्यातून निघून गेले त्यांना योग्य निरोपही देऊ शकलो नाही असं म्हणताना पंतप्रधान मोदी गदगदले. ते म्हणाले की, "कोरोना काळात अनेक लोक त्यांच्या परिवारापासून तुटले, कित्येकांना घरी जाता आलं नाही, शेकडो लोक असेही आहेत जे कधीच घरी परतले नाहीत. त्यांनी एक-एक जीव वाचवण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले."


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "या कोरोनाचे पहिले लसीकरण हे आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. या माध्यमातून आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या कोरोना योध्यांना श्रध्दांजली दिला जाईल."


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, "भारताने या महामारीचा ज्या प्रकारे सामना केला त्याचे कौतुक आज जगभरातून होत आहे. केंद्र आणि राज्यांनी तसेच स्थानिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन चांगलं काम केलं. हा एक चांगला आदर्श भारताने जगापुढे ठेवला."


पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. भारतीय लस, विदेशी लसींच्या तुलनेत अतिशय स्वस्त असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसेच या लसींचा वापरही तितकाच सोपा असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.


लसीकरण जरी सुरु झाले असले तरी लोकांनी मास्क वापरणे आणि हात स्वच्छ धुणे या सवयी कायम ठेवाव्यात असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.


Corona Vaccination | कोण आहेत पहिल्या टप्प्यात लस मिळणारे 'फ्रंटलाईन वर्कर्स'?