Corona Update India : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, धोका अद्याप टळलेला नाही. देशात पुन्हा एकदा 50 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 54,069 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1321 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मंगळवारी 50,848 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या 24 तासांत 68,885 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात सलग 42व्या दिवशी कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांहून अधिक कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा आहे. 23 जूनपर्यंत देशभरात 30 कोटी 16 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 64 लाख 89 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 39 कोटी 78 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.
देशातील आजची कोरोना स्थिती :
एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 82 हजार 778
कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 90 लाख 63 हजार 740
एकूण सक्रिय रूग्ण : 6 लाख 27 हजार 57
एकूण मृत्यू : 3 लाख 91 हजार 981
मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाबाधित वाढले, 10,066 नवीन कोरोनाबाधित तर 11,032 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. मात्र मंगळवारच्या तुलनेत काल कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. काल 10,066 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 11,032 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मंगळवारी 8 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती आणि 9 हजार 046 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
आता राज्यभरात बरे होणाऱ्यांची संख्या आता 57,53,290 इतकी झाली आहे. काल (बुधवारी) 163 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.93 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 163 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.99 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,01,28,355 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,97,587 (14.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,92,108 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,223 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात काल रोजी एकूण 1,21,859 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रभाव वाढण्याची शक्यता, राज्यांनी खबरदारी घ्यावी, केंद्राचे निर्देश
महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेशनंतर आता देशाच्या इतर भागातही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना, विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना खबरदारी घेऊन तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.
बुधवारपर्यंत भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 40 रुग्ण सापडले आहेत. केरळमधील तीन जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्याने खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. महाराष्ट्रात जळगाव आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण सापडले आहेत. तामिळनाडूमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एक रुग्ण सापडला आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट हा आतापर्यंत 11 देशांमध्ये सापडला आहे. आसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडून डेल्टा प्लस या व्हेरिएंटचा अभ्यास करण्यात येत आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रसार हा वेगाने होत असून त्यामुळे फुफ्फुसांच्या पेशींना हानी पोहोचते. डेल्टा प्लसवर काय उपचार घेता येतील तसेच याच्या विरोधात शरीरात अॅन्टिबॉडीज् तयार होतात का याची अद्याप माहिती नाही. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन या कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :