जगातील श्रींमतांची यादी काढली तर अनेक मोठमोठी नावं त्यामध्ये येतील. जगातील श्रीमंत व्यक्ती म्हटल्यावर त्यांचं दानही तितकचं मोठं असतं. मात्र गेल्या शंभर वर्षातील जगातील सर्वाधिक दानशूर व्यक्ती कोण विचारल तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच बिल गेट्स, वॉरेन बफेट अशी मोठी नावं येतील. मात्र यापैकी कुणीही जगातील सर्वात दानशूर व्यक्ती नसून ही व्यक्ती एक भारतीय आहे आणि ते जास्त अभिमानस्पद आहे. जमशेदजी टाटा हे जगातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले आहेत. 


जमशेदजी टाटा यांनी गेल्या 100 वर्षात 102 अब्ज डॉलर्स दान केले आहेत. हुरुन रिपोर्ट आणि अॅडेलगिव फाऊंडेशनने सर्वाधिक दानशूर टॉप 50 व्यक्तींची यादी जारी केली आहे. यामध्ये टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा अव्वल स्थानी आहेत. या यादीत बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा (आता एकत्र नाहीत) दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी 74.6 अब्ज डॉलर्स दान केले आहेत. या व्यतिरिक्त वॉरेन बफेट यांनी 37..4 अब्ज डॉलर्स, जॉर्ज सोरोस यांनी 34.8 अब्ज डॉलर आणि जॉन डी रॉकफेलर यांनी 26.8 अब्ज डॉलर्स दान केले आहेत.






गेल्या शतकात अमेरिकन आणि युरोपीयन दानशूर व्यक्तींनी वर्चस्व गाजवलं. मात्र टाटा ग्रुप ऑफ इंडियाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे जगातील सर्वात मोठे दानशूर आहेत, असं हुरुनचे अध्यक्ष आणि मुख्य संशोधक रूपर्ट हुगवेरफ यांनी एका निवेदनात म्हटलं.


रूपर्ट हुगवेरफ यांनी पुढे म्हटलं की, जमशेदजी टाटा यांनी आपली दोन तृतीयांश संपत्ती ट्रस्टला दिली, जे शिक्षण आणि आरोग्यासह अनेक क्षेत्रात चांगले काम करत आहेत. यामुळेच टाटा यांना या यादीत अव्वल स्थान मिळवण्यात मदत झाली. जमशेदजी टाटा यांनी 1892 पासून दान करणे सुरू केले होते.


या लिस्टमध्ये केवळ दोन भारतीय


जमशेदजी टाटा यांच्या व्यतीरिक्त या यादीत दुसरं नाव विप्रोच्या अजीम प्रेमजी यांचं आहे. त्यांनी जवळपास 22 अब्ज डॉलर दान केले आहेत. हूगवेरफ यांनी म्हटलं की, अल्फ्रेड नोबेल यांच्यासारखी अशी काही नावे आहेत जी पहिल्या 50 दानशूर व्यक्तींमध्येही नाहीत. या यादीत अमेरिकेचे  39, यूकेचे पाच आणि तीन चीनमधील व्यक्ती आहेत. यापैकी एकूण 37 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर यादीतील केवळ 13 लोक जिवंत आहेत.


जगातील टॉप 10 दानशूर



  1. जमशेदजी टाटा- 102.4 अब्ज डॉलर्स (भारत)

  2. बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स - 74.6 अब्ज डॉलर्स (अमेरिका)

  3. हेन्री वेलकम - 56.7 अब्ज डॉलर्स (युके)

  4. हॉवर्ड ह्यूजेस - 38.6 अब्ज डॉलर्स (अमेरिका)

  5. वॉरेन बफे - 37.4 अब्ज डॉलर्स (अमेरिका)

  6. जॉर्ज सोरोस- 34.8 अब्ज डॉलर्स (अमेरिका)

  7. हंस विल्स्डॉर्फ- 31.5 अब्ज डॉलर्स (स्वित्झर्लंड)

  8. जेके लिलि सर- 27.5 अब्ज डॉलर्स (अमेरिका)

  9. जॉन डी रॉकफेलर - 26.8 अब्ज डॉलर्स (अमेरिका)

  10. एडसेल फोर्ड - 26.6 अब्ज डॉलर्स (अमेरिका)