नवी दिल्ली : कोरोनाच्या सावटातून आपण आता कुठे सावरतोय तोच एका नव्या विषाणूचं सावट जगाला भेडसावतं आहे. आफ्रिकेत सापडलेल्या या नव्या विषाणूचं नामकरण जागतिक आरोग्य संघटनेनं 'ओमिक्रॉन' असं केलंय. जगात अनेक देशांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत, आज दिल्लीतही पंतप्रधानांनी तातडीची बैठक बोलावली.
आधी अल्फा, मग बीटा, मग डेल्टा आणि आता 'ओमिक्रॉन..'कोरोनाच्या नव्या विषाणूंची ही साखळी थांबता थांबेना..आता आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या विषाणूनं सध्या सगळ्या जगाची चिंता वाढवली आहे. WHO नं या व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या यादीत टाकलंय. अनेक देशांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. भारतातही आज पंतप्रधान मोदींनी या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली.
भारतात सध्या या कोरोनाच्या नव्या 'ओमिक्रॉन' विषाणूचा एकही रुग्ण सापडलेला नाही. पण मागच्या लाटेत आपल्याला जोरदार तडाखा बसला होता. हा नवा विषाणू डेल्टापेक्षाही भयानक मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी यावेळी उशीर होऊ नये यासाठी ही उच्चस्तरीय बैठक बोलावली. कॅबिनेट सचिव राजीव गौबा, आरोग्य सचिव राजेश भूषण नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
अमेरिका, रशिया, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांनी आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईटसवर बंदी घातलीय. न्यूयॉर्कमध्ये हेल्थ एमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. भारतातही तातडीनं फ्लाईटस बंदी लागू करण्यात यावी अशी मागणी मुंबईच्या महापौरांनी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षाही प्रचंड वेगानं पसरतोय. आत्तापर्यंत या विषाणूचे 50 म्युटंटस सापडल्याचं डॉ. रमण गंगाखेडकर यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हटलंय. पण सोबतच अजून या विषाणूमुळे नेमकी हॉस्पिटलायझेशनची गरज किती, मृत्यूचं प्रमाण किती आहे याचा अभ्यासपूर्ण निष्कर्ष समोर आलेला नाहीय. पण कमी संख्या असतानाही जगात यावेळी सतर्कता अधिक आहे ही त्यात चांगली गोष्ट म्हणायला हवी असंही त्यांनी म्हटलंय.
विषाणूचं नाव | सुरुवात कुठून | डब्लू एच ओ कडून नामकरण |
अल्फा | ब्रिटन , सप्टें 2020 | 18 डिसेंबर 2020 |
बीटा | साऊथ आफ्रिका मे 2020 | 18 डिसेंबर 2020 |
गामा | ब्राझिल ऑक्टो 2020 | 11 जानेवारी 2021 |
डेल्टा | भारत ऑक्टो 2020 | 11 मे 2021 |
ओमिक्रॉन | एकापेक्षा अनेक देशांत नोव्हेंबर 21 | 26 नोव्हेंबर 2021 |
मार्च 2020 पासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लाईटस भारतात 15 डिसेंबरपासून सुरु होतील असं कालच जाहीर करण्यात आलंय. अर्थात त्यात वेगवेगळ्या देशांचे तीन गट धोका पातळीनुसार करण्यात आले आहेत. पण आफ्रिकन विषाणूच्या वाढत्या उद्रेकामुळे या फ्लाईटसबंदीबाबत पुन्हा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे
सध्याच्या लसी या नव्या विषाणूवर प्रभावी ठरतील का, की नव्या बूस्टर डोसची गरज पडेल असेही प्रश्न आहेत. आफ्रिकेत अवघ्या काही दिवसांपूर्वी दिवसाला 200 रुग्ण सापडत होते ती संख्या एका आठवड्यात दिवसाला 2 हजारावर पोहचलीय. जगभरातल्या शेअर मार्केटमध्ये तर या विषाणूनं पडझड केलीच आहे. पण आता पुन्हा रस्ते ओस पडण्याची वेळ येऊ नये ही काळजी घ्यावी लागेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाला जोरदार तडाखा बसला होता. आत्ता कुठे आपण त्यातून सावरतोय तोच या नव्या विषाणूचं संकट आता पुन्हा घोंगावताना दिसतंय.
Coronavirus new variant : ओमिक्रॉन हा व्हेरियंट आतापर्यंत कुठे कुठे पसरल्याची भीती व्यक्त होतेय?