नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे भविष्यात काय काय साईड इफेक्टस पाहायला मिळू शकतात याची धक्कादायक आकडेवारी नॅशनल हेल्थ मिशनच्या अहवालात समोर आलीय. आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाल्यानं नवजात बालकांच्या लसीकरणात कमालीची घट लॉकडाऊन काळात झाल्याचं दिसतंय. लसीकरणाच्या शिबिरांमध्ये तब्बल 64 टक्क्यांची घट लॉकडाऊनच्या काळात झाल्याचं समोर आलंय.


एप्रिल ते जून या काळातली ही आकडेवारी चिंताजनक आहे. लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या लसीकरणाचा कार्यक्रमच या काळात होऊ न शकल्यानं भविष्यात मुलांच्या आरोग्यावर त्याचा कायमचा परिणाम होऊ शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या लसींच्या बाबतीत 44 ते 77 टक्क्यांची घट झाल्याचं नॅशनल हेल्थ मिशनच्या आकडेवारीत समोर आलंय. क्षयरोगाच्या बचावासाठी आवश्यक असणारी बीसीजीची लस तब्बल 10 लाख बालकांना या काळात मिळूच शकली नाही अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.


जानेवारी महिन्याच्या तुलनेत बीसीजीच्या लसीकरणात तब्बल 50 टक्के घट झालीय. तर 6 लाख बालकांना त्यांचा पोलिओचा पहिला डोस मिळू शकलेला नाही. शिवाय 14 लाख बालकांना पाच आजारांपासून वाचवणारा पेंटाव्हेलंट शॉट मिळू शकला नसल्याचं समोर आहे. या पाच आजारांमध्ये धनुर्वात, हिपॅटटिटीस बी, न्यूमोनिया यांचा समावेश आहे. देशातल्या 2 लाख आरोग्य केंद्रांचा सर्व्हे केल्यानंतर ही आकडेवारी नॅशनल डिजीटल हेल्थ मिशननं जाहीर केली आहे. शिवाय एप्रिलमध्ये जेव्हा लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवस्था बंद होत्या तेव्हा जवळपास 73 टक्के लॅब टेस्टही झालेल्या नव्हत्या. एप्रिल ते जून या तीन महिन्यांतली ही आकडेवारी आहे. जून नंतर सरकारनं काही प्रमाणात सेवा सुरु केल्या. पण ग्रामीण, खेड्यापाड्यात या सेवा तरीही पूर्ण क्षमतेनं सुरु होऊ शकल्या नाहीत, शिवाय अनेक ठिकाणी वाहतुकीच्या ही समस्या असल्यानं ही स्थिती लवकर सुधारणं कठीण आहे. त्यामुळे कोरोनाशी लढताना झालेल्या चुकांमुळे भविष्यात आरोग्याचे इतर प्रश्न निर्माण होऊ नयेत हीच भीती व्यक्त होतोय. याबाबत जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र परिषदा यांनीही वेळोवेळी धोक्याचा इशारा दिला होता.