नवी दिल्ली :  देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्याचं दिसून येतंय. देशातील अनेक भागात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहे. या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट केले आहे. सर्वांनी एकजुटीने कोरोना संकटाचा सामना केला पाहिजे, असे ते म्हणाले. 


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान  ट्वीटमध्ये म्हणाले, कोरोनाच्या संकटात सापडलेल्या भारतातील नागरिकांच्या संवेदना समजू शकतो. या संकटाचा आपण एकजुटीने सामना केला पाहिजे  करोनामुळे पीडित शेजारी आणि जगभरातील लोकांसाठी  ते लवकर बरे व्हावे यासाठी आम्ही प्रार्थना करतो. माणुसकीच्या नात्याने या जागतिक संकटाला तोंड देणं आवश्यक आहे. 


पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी देखील ट्वीट केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करण्याऱ्या भारतीयांसोबत आम्ही आहोत. आम्ही पाकिस्तानच्या नागरिकांकडून कोरोनाबाधित कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. 


 एकाच दिवसात देशात तीन लाख 46 हजार 786 रुग्णांची भर पडली आहे. देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. गेल्या 24 तासात 2624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत वाढ झाली असून ती आता 25 लाख 52 हजार 940 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात दोन लाख 19 हजार 838 रुग्ण बरे झाले आहेत. 


देशातील वाढती रुग्णसंख्या ही चिंताजनक असून त्यामुळे देशातल्या आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. पंतप्रधान मोदी आज पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तीन प्रमुख आढावा बैठका घेणार आहेत. सध्या देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये पाहायला मिळत आहे. या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी वर्च्युअल माध्यमातून बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन काही उपाययोजनांवर चर्चा करणार आहेत.


देशातील आजची कोरोना स्थिती : 



  • एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 62 लाख 63 हजार 695

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 36 लाख 48 हजार 159

  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 24 लाख 28 हजार 616

  • कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 86 हजार 920

  • देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 13 कोटी 54 लाख 78 हजार 420 डोस